मनोज सातवी, प्रतिनिधी
Palghar News : पालघर जिल्ह्यात हवामान विभागाकडून रेड अलर्ट देण्यात आला आहे. गेल्या आठवडाभरापासून पालघरमध्ये तुफान पाऊस कोसळत आहे. त्यामुळे अनेकांच्या घरात पाणी शिरलंय तर वीज पुरवठाही विस्कळीत झाला आहे. परिणामी जनसामान्यांचं जनजीवन विस्कळीत झालं आहे. दरम्यान एका गर्भवती महिलेला अक्षरश: दरवाज्याचं स्ट्रेचर करून रुग्णालयात भरती करण्याची वेळ आली आहे.
दरवाज्याचं स्ट्रेचर करून गर्भवतीला काढलं बाहेर...
पालघरच्या केळवे रोड जवळील मायखोप हनुमानपाडा येथे गावाला पुराचा वेढा असताना येथील प्रियांका रवी यादव या गरोदर महिलेला अचानक प्रसूती कळा येऊ लागल्या. परंतू पूर स्थितीमुळे वाहतूक पूर्णपणे ठप्प असल्याने स्थानिक आशा सेविका दिव्या घरत आणि सामाजिक कार्यकर्ते चेतन गावड यांनी आपल्या पूर्ण टीमसह मदतीसाठी धाव घेतली. या परिसरात प्रचंड पाणी जमा झालं होतं. त्यामुळे तेथे रुग्णवाहिका येणे अशक्य होतं.
अशावेळी या टीमने अत्यंत आणीबाणीच्या परिस्थितीत दरवाजाचा स्ट्रेचर म्हणून वापर करून गरोदर महिलेला दाराच्या स्ट्रेचरवर झोपून जीव धोक्यात घालून थेट छातीभर पाण्यातून वाट काढून कसंबसं रुग्णालयात दाखल केलं. रुग्णालयात दाखल केल्यानंतर डॉक्टरांच्या देखरेखीखाली प्रियांका यादव यांची सुखरूप प्रसूती झाली असून त्यांनी एका गोंडस मुलाला जन्म दिला आहे. आशा सेविका आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी या आणीबाणीच्या परिस्थितीत दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे, त्यांच्या संवेदनशील आणि धाडसी कार्याबद्दल त्याचं सर्व स्थरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे.