Palghar News: पालघर तालुक्यातील नवापूर ग्रामपंचायतीचे ग्रामविकास अधिकारी राजेश पंढरीनाथ संखे यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने 20 हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात अटक केली आहे. कृषी पर्यटन केंद्र सुरू करण्यासाठी आवश्यक ना-हरकत दाखला देण्याच्या बदल्यात लाचेची मागणी केल्याची तक्रार होती. मंगळवारी सायंकाळी सापळा रचून ही कारवाई करण्यात आली. या प्रकरणी सातपाटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस उपअधीक्षक दादाराम करांडे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
पालघर तालुक्यातील नवापूर ग्रामपंचायत हद्दीतील तक्रारदाराच्या मालकीच्या शेतीमध्ये कृषी पर्यटनासाठी तरंग तलाव, तीन रुम, उपहार सुरु करण्याच्या उद्देशाने ग्रामपंचायतीचा ना हरकत दाखला मिळवण्यासाठी 30 ऑक्टोबर 2025 रोजी ग्रामपंचायत कार्यालयलयात अर्ज केला होता. ना हरकत दाखला देण्यासाठी ग्रामपंचायत अधिकारी राजेश संखे यांनी 20 हजार रुपयांच्या लाचेची मागणी केल्याची तक्रार लाचलुचपत विभागाच्या पालघर युनिटकडे केली होती.
(नक्की वाचा- Crime News: अंबरनाथमध्ये मुख्यमंत्र्यांच्या सभेआधी गोळीबार! भाजप उमेदवाराच्या कार्यालयावर चार राऊंड फायर)
तक्रारीनुसार मंगळवारी करण्यात आलेल्या पडताळणीमध्ये ग्रामपंचायत अधिकारी राजेश संखे यांनी तक्रारदारांकडे 20 हजार रुपयांच्या लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाल्यानंतर सापळा रचण्यात आला होता. यावेळी राजेश पंढरीनाथ संखे याला तक्रारदाराकडून पंचासमक्ष 20 हजार रुपये लाच स्वीकारताना रंगेहात ताब्यात घेण्यात आले. याप्रकरणी सातपाटी पोलीस ठण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
(नक्की वाचा- Akola News: अकोला महापालिका निवडणुकीत भाजपची कोंडी; बंडखोरांची नवी आघाडी पक्षासाठी ठरणार डोकेदुखी)
कारवाई लाचलुचपत विभागाचे पोलीस उप-अधीक्षक दादाराम करांडे यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक राकेश डांगे,पोलीस अंमलदार विलास भोये, आकाश लोहारे, जितेंद्र गवळे यांच्या पथकाकडून करण्यात आली.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world