सुरज कसबे, प्रतिनिधी
Pimpri-Chinchwad News : पोलीस असल्याचं भासवून वयोवृद्ध महिला आणि पुरुषांना बोलण्यात गुंतवून हातचलाखीने सोन्याचे दागिने लंपास करणाऱ्या एका सराईत इराणी गुन्हेगाराला पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखा युनिट-२ च्या पथकाने मोठ्या धाडसाने अटक केली आहे. मोहम्मद सय्यद कंबर अली असं अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून त्याला ठाणे जिल्ह्यातील अंबिवली येथील इराणी वस्तीतून ताब्यात घेण्यात आलं आहे.
पोलीस असल्याचं सांगून वृद्धांना लुटलं...
मागील काही दिवसांपासून पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत वृद्धांना गाठून आम्ही पोलीस आहोत, पुढे चोरी झाली आहे, तुमचे दागिने काढून रुमालात ठेवा असे सांगून दागिने लांबवण्याचे प्रकार वाढले होते. असाच एक प्रकार हिंजवडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडला होता. ज्याबाबत भारतीय न्याय संहिता (BNS) कलम २०४, ३१९(२), ३(५) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. घटनेचं गांभीर्य ओळखून पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांनी आरोपींना तत्काळ अटक करण्याचे आदेश दिले होते. गुन्हे शाखा युनिट-२ च्या पथकाने तपास करताना परिसरातील सुमारे १०० ते १२० सीसीटीव्ही फुटेजची कसून पाहणी केली. त्यावरून आरोपी हे ठाण्यातील अंबिवली येथील इराणी वस्तीतील असल्याचे निष्पन्न झाले.
वेशांतर करुन दबा धरला...
वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद पवार आणि त्यांच्या पथकाने दोन दिवस अंबिवली परिसरात वेशांतर करून दबा धरला होता. आरोपी मोहम्मद अली हा त्याच्या भाड्याच्या खोली जवळ दिसताच पोलिसांनी त्याला झडप घालून ताब्यात घेतलं. यावेळी त्याच्या नातेवाईकांनी पोलिसांना अटकाव करण्याचा प्रयत्न केला, मात्र पथकाने मोठ्या धाडसाने त्याला तेथून बाहेर काढलं आणि अटक केली. तपासामध्ये या आरोपीने हिंजवडी आणि देहूरोड पोलीस ठाण्याच्या हद्दीत गुन्हे केल्याची कबुली दिली आहे. सदर आरोपी हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्याच्यावर विविध राज्यांमध्ये फसवणुकीचे अनेक गुन्हे दाखल आहेत. या आरोपीबाबत अधिक माहिती असल्यास किंवा तो इतर कोणत्या गुन्ह्यात हवा असल्यास गुन्हे शाखा युनिट-२ चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद पवार यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे. पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे, सह पोलीस आयुक्त डॉ. शशिकांत महावरकर, अपर पोलीस आयुक्त बसवराज तेली, सारंग आवाड, आणि पोलीस उप-आयुक्त (गुन्हे) प्रदिप जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद पवार, मयुरेश साळुंखे आणि त्यांच्या पथकाने ही यशस्वी कारवाई केली.