राज्यात अद्यापही महिलांवरील होणाऱ्या अत्याचाराच्या घटनांमध्ये घट झाल्याचं पाहायला मिळत नाही. अगदी कठोर शिक्षेची तरतूद असूनही बलात्कार, छेडछाडीपासून ते विवाहानंतर लैंगिक अत्याचार, हत्येच्याही घटना वारंवार समोर येत असतात. महिलांवरील अत्याचाराच्या घटनांवर नियंत्रण आणण्यासाठी सामाजिक बदलाची गरज व्यक्त केली जाते. लहानपणापासूनच मुलांना महिलांचा मान-सन्मान ठेवण्याची शिकवण दिली जायला हवी. बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणातही उच्च न्यायालयाने हाच मुद्दा अधोरेखित केला होता. लैंगिक अत्याचाराचे प्रमाण कमी करण्यासाठी महिलांचा आदर राखणे आणि मुलांच्या मनात लैंगिक समानतेची संकल्पना रुजवणे आवश्यक असल्याची भूमिका उच्च न्यायालयाकडून व्यक्त करण्यात आली होती.
नक्की वाचा - UP Crime: असहाय्य तरुण- तरुणी, नराधमांनी विवस्त्र केलं, व्हिडिओ काढले अन्... संतापजनक घटना
त्याचाच एक भाग म्हणून पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेने एक पत्रक काढलं आहे. या पत्रकानुसार स्त्रियांचा अपमान करणारे अपशब्द आणि शिव्यांचा वापर करण्यास बंदी घालण्यात आली आहे. पिंपरी-चिंचवड महापालिकेअंतर्गत येणाऱ्या सर्व शाळांसाठी हे परिपत्रक काढण्यात आलं असून विद्यार्थ्यांनी स्त्रियांचा अपमान करणाऱ्या अपशब्दांचा वापर करू नये अशा सूचना देण्यात आल्या आहेत. विशेष म्हणजे पिंपरी-चिंचवड महापालिकेअंतर्गत सर्व शाळेतील विद्यार्थ्यांना याची शपथ घ्यावी लागणार आहे. मात्र एखाद्या विद्यार्थ्याने महिलांचा अपमान करणाऱ्या शिव्यांचा वापर केल्यास त्याच्यावर काय कारवाई करणार, याबाबत अद्याप अस्पष्टता आहे.
नक्की वाचा - Video : इतकं मारलं की, आयुष्यभर मुलींच्या आजूबाजूला फिरकणार नाही; 'रणरागिणी'चं रुप पाहून भले भले अवाक्
भारतीय संविधानाने दिलेला मानवी प्रतिष्ठेने जगण्याचा व समानतेचा मुलभूत हक्क, स्त्रियांच्या प्रतिष्ठेला उणेपणा आणणाऱ्या प्रथांचा त्याग करणे, लिंगाधारित समानतेमाठी, माता-भगिनी व एकूणच स्त्रीत्वाच्या सन्मानासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचं सांगितलं जात आहे. आपल्या समृद्ध संस्कृतीच्या संरक्षणासाठी आणि सभ्य, सुसंस्कृत व अभिरूची संपन्न समाज निर्मितीसाठी भारतीय संविधानाच्या तरतुदींच्या आणि राज्यातील माता भगिनींच्या सन्मानाकरिता व लिंगाधारित समानतेसाठी अशा शिव्याच्या वापरास बंदी घालण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
सर्व शाळांमध्ये बंदी घालण्याविषयी तसेच विद्यार्थ्यांची याची शपथ घेण्याविषयी सूचना देण्यात आली आहे.