सुरज कसबे, पिंपरी-चिंचवड
Pimpri Chinchwad News: इंद्रायणी नदीच्या प्रदूषणाचा प्रश्न पुन्हा एकदा गंभीर झाला आहे. पिंपरी-चिंचवड महानगरपालिका हद्दीतील दाभाडे सरकार चौक ते चऱ्होली खुर्द गावाला जोडणाऱ्या पुलाजवळ नदीच्या पात्रात थेट रसायने (Chemicals) सोडली जात असल्याचे समोर आले आहे. या विषारी पाण्यामुळे नदीचा नैसर्गिक जलस्त्रोत नष्ट होण्याच्या मार्गावर असून, स्थानिक रहिवाशांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.
'काळी' पडली इंद्रायणी
नदीच्या पात्रात विनाप्रक्रिया रसायनयुक्त सांडपाणी सोडले जात असल्याने नदीचे पाणी पूर्णपणे काळवंडले आहे. नदी परिसरात पसरलेल्या तीव्र दुर्गंधीमुळे नागरिकांना घराबाहेर पडणे कठीण झाले आहे. दूषित पाण्यामुळे मासे आणि इतर जलचरांच्या अस्तित्वावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून पर्यावरणाचे संतुलन पूर्णपणे बिघडले आहे.
(नक्की वाचा- Aurangpura Renamed: छत्रपती संभाजीनगरमधील औरंगपुराचं नाव बदललं; महापालिकेत नामांतराचा प्रस्ताव मंजूर)
नागरिकांच्या आरोग्याशी खेळ
प्रदूषित पाण्यामुळे केवळ पर्यावरणच नव्हे, तर मानवी आरोग्यालाही मोठा धोका निर्माण झाला आहे. नदीकाठच्या परिसरातील नागरिकांना त्वचेच्या विकारांचा सामना करावा लागत आहे. दूषित हवा आणि पाण्यामुळे पचनाचे विकार आणि इतर गंभीर आजार पसरण्याची भीती तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. वारंवार तक्रारी करूनही महापालिकेचा पर्यावरण विभाग याकडे डोळेझाक करत असल्याचा आरोप पर्यावरण प्रेमींनी केला आहे.
(नक्की वाचा- Pune News: रिंग रोडसाठी शेतकरी कुटुंबाला रस्त्यावर आणलं; डोळ्यासमोर संसार उद्ध्वस्त)
कठोर कारवाईची मागणी
स्थानिक नागरिक आणि पर्यावरण प्रेमींनी महापालिका प्रशासनाकडे या प्रकरणाची तातडीने चौकशी करण्याची मागणी केली आहे. महापालिकेच्या पर्यावरण विभागाने या घटनेची तातडीने दखल घेऊन नदीत जाणारे विषारी पाणी रोखावे, अशी मागणी होत आहे. तसेच, नैसर्गिक जलस्त्रोताचे प्रदूषण करणाऱ्या संबंधित व्यक्ती किंवा संस्थांवर कठोर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.