संजय तिवारी, नागपूर
विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीची कामगिरी लाजीरवाणी राहिली. काँग्रेसला तर अवघ्या 16 जागांवर समाधान मानवं लागले. काँग्रेसच्या विधानसभा निवडणुकीतील कामगिरीनंतर पक्षात भाकरी फिरणार अशी शक्यत वर्तवली जात होती. पक्षाचा प्रदेशाध्यक्ष बदलण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तरुण नेत्यांकडे पक्षाची जबाबदारी देण्याचं देखील बोललं जात होतं. मात्र तरुण नेत्यांचा प्रदेशाध्यक्ष पदासाठी नकार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
सतेज पाटील, अमित देशमुख आणि विश्वजीत कदम यांना प्रदेशाध्यक्ष पदाची जबाबदारी घेण्यात रस नसल्याची माहिती आहे. आपल्याला सध्या हे पद नको असल्याचे त्यांनी पक्षातील वरिष्ठांना सांगितल्याची माहिती आहे.
विजय वडेट्टीवार यांचं नाव आघाडीवर
हायकमांडकडून विजय वडेट्टीवार यांच्या नावाचा प्रदेशाध्यक्ष पदाकरीता विचार केला जात असल्याची माहिती आहे. विधानसभा निवडणुकीत झालेली पिछेहाट आणि अशात आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तोंडावर असल्याने वडेट्टीवार यांच्यासारखा आक्रमक नेता अध्यक्ष म्हणून हवा असा पक्षातल्या काही प्रादेशिक नेत्यांचा आग्रह आहे. नाना पटोले यांनी सार्वजनिकरित्या स्पष्ट केले आहे की प्रदेशाध्यक्ष पदावर कुणाचीही निवड झाली तर त्यांची हरकत नसेल. मात्र, वडेट्टीवार यांची प्रदेशाध्यक्षपदी निवड झाली तर पटोले समर्थकांना ते पचनी पडणार नाही अशी देखील चर्चा आहे.
नक्की वाचा - Exclusive : मुंडे, कराड, गुंडाराज अन् लाल डायरी... सुरेश धस एवढे आक्रमक का झाले?
यशोमती ठाकूर यांचंही नाव चर्चेत
प्रदेश काँग्रेसमधील एका गटाकडून यशोमती ठाकूर यांचे नाव वेगाने पुढे करण्यात येत आहे. त्या राहुल गांधी यांच्या निकटवर्तीय गोटात सामील असून आक्रमक महिला नेत्या आहेत. प्रभा राव नंतर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी अध्यक्ष पदावर कोणत्याही महिला नेत्याची निवड झालेली नाही. मात्र, यशोमती ठाकूर या विधानसभा निवडणुकीत यशस्वी झाल्या नसल्याने त्यांच्या निवडीबाबत शंका उपस्थित होत आहे. अलीकडेच यशोमती ठाकूर यांनी नाना पटोले यांची त्यांच्या गावी भेट घेतली आणि त्यांच्याशी चर्चा केली होती. निवडणूक याचिका दाखल करण्यासंबंधी ही भेट होती असे नंतर सांगण्यात आले होते.
(नक्की वाचा- Santosh deshmukh case:'...तर धनंजय मुंडे यांच्यावरही कारवाई केली जाईल' शिंदेंचे मंत्री थेट बोलले)
नाना पटोले यांना मातृशोक झाला असल्याने ते भंडारा जिल्ह्यातील आपल्या गावी सुकळी येथे आहेत. येत्या 11 तारखेला शनिवारी त्यांच्या गावच्या घरी तेरावी आणि गंगापुजनचा कार्यक्रम असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्याच दिवशी सुकळी येथे जाऊन त्यांची भेट घेणार असल्याचे सांगितले जात आहे.