'लाडक्या खड्ड्या' तुझ्यासाठी काहीही; जीव मुठीत घेऊन बदलापुरकरांचा जीवघेणा प्रवास 

लाडकी बहीण झाली, लाडका भाऊ झाला आता मुख्यमंत्र्यांकडे लाडक्या खड्ड्याकडे लक्ष देण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins
बदलापूर:

ठाणे, डोंबिवलीनंतर नवं शहर म्हणून विस्तारणाऱ्या बदलापुरात (Badlapur Potholes) राहणाऱ्या नागरिकांचे प्रश्न दिवसेंदिवस अधिक कठीण होत चालले आहेत. एकीकडे लोकल मार्गाने ऑफिस गाठताना गुदमराला लावणारी गर्दी, अपुऱ्या लोकल, विलंबाने धावणाऱ्या लोकल अशा अनेक समस्या असताना रस्ते मार्गही खडतर होत चालला आहे. अंबरनाथ-बदलापूर (Badlapur Ladka khadda) मार्गावर मोठी वाहतूक कोंडी होत आहे. यामागील कारण रस्त्यावरील खड्डे आहे. खड्डेमय रस्त्यांवरून वाट कशी काढायची असा मोठा प्रश्न नागरिकांसमोर उभा ठाकला आहे. 

त्यामुळे या 'लाडक्या खड्ड्या'पासून सुटका करून घेण्यासाठी बदलापुरातील राष्ट्रवादी शरद पवार गटाने शहरात उपहासात्मक बॅनर लावले आहेत.  बदलापूर शहरातील रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले असून याकडे पालिका आणि प्रशासनाचं लक्ष वेधण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाने 'लाडका खड्डा' असे उपरोधिक बॅनर लावले आहेत. मुख्यमंत्र्यांच्या जिल्ह्यातच खड्डे पडले असल्यामुळे त्यांचं नाव 'लाडका खड्डा' ठेवल्याचं राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष अविनाश देशमुख यांनी सांगितलं आहे.

Advertisement

सध्या राज्यात लाडकी बहीण आणि लाडका भाऊ योजनेची मोठी चर्चा आहे. एकीकडे सरकार अशा योजना आणत असताना मुख्यमंत्र्यांच्या जिल्ह्यात मात्र नागरिकांना चांगले रस्ते पुरविण्याकडे सरकारचं दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे सरकारचं आणि पालिका प्रशासनाचं लक्ष वेधण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाने 'लाडका खड्डा' असे बॅनर्स खड्ड्यांच्या बाजूला लावले आहेत. जिल्हा उपाध्यक्ष अविनाश देशमुख यांनी बॅनर्स लावले असून आता तरी बदलापूर शहरातले खड्डे बुजवले जातील का? असा सवाल बदलापूरकरांकडून उपस्थित केला जात आहे. 

Advertisement

नक्की वाचा - टेकऑफ केलं, संतुलन बिघडलं अन्...; नेपाळ प्लेन क्रॅशमध्ये 18 प्रवाशांचा मृत्यू, भयंकर Video

बदलापूर-अंबरनाथ मुख्य रस्त्यावर तयार झाला तलाव!
बदलापूरहून अंबरनाथला येणाऱ्या मुख्य रस्त्याला पावसाच्या पाण्यामुळे अक्षरशः तलावाचं स्वरूप आलंय. रस्त्यावर साचलेल्या या पाण्यातून वाहनं चालवताना वाहन चालकांची मोठी तारांबळ उडत असून या समस्येकडे प्रशासन आणि लोकप्रतिनिधींनी पूर्णपणे दुर्लक्ष केल्याचं पाहायला मिळतंय. बदलापूरहून अंबरनाथकडे येणाऱ्या मुख्य रस्त्यावर बदलापूरच्या ग्रामीण रुग्णालयासमोर मोठ्या प्रमाणात पाणी साचलं आहे. रस्त्यावर असलेले खड्डे आणि पावसाच्या पाण्यामुळे रस्त्याला आलेलं तलावाचं स्वरूप यामुळे वाहनांचा वेग मंदावत असून वाहतूक कोंडीची समस्या भेडसावू लागली आहे. तर याच ठिकाणी आजवर अनेक दुचाकी चालकांचे अपघातही झाले असून काही जणांना दुखापतही झाली आहे. हा रस्ता कर्जत, नेरळ, वांगणी, शेलु, बदलापूर या भागातून डोंबिवली, शिळफाटा, ठाणे, नवी मुंबईला जाण्यासाठी एकमेव मुख्य रस्ता असून त्याचीच अशी दुरवस्था झाल्यामुळे वाहनचालकांमधून संताप व्यक्त होत आहे. तर प्रशासन आणि लोकप्रतिनिधींकडून मात्र याकडे दुर्लक्ष होत असल्याचं पाहायला मिळतंय.

Advertisement