शरद सातपुते, प्रतिनिधी
UPSC Result 2025 : केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (UPSC) नागरी सेवा परीक्षा 2025 चा अंतिम निकाल जाहीर झाला असून यंदाही महाराष्ट्रातील तरुणांनी आपले वर्चस्व सिद्ध केले आहे. या परीक्षेत देशातील एकूण 958 उमेदवार यशस्वी झाले असून त्यामध्ये महाराष्ट्रातील 60 हून अधिक उमेदवारांचा समावेश आहे. UPSC परीक्षा उत्तीर्ण होणं अनेक तरुणांचं स्वप्न असतं. यासाठी वर्षानुवर्षे विद्यार्थी भूक-तहान विसरून काम करीत असतात. अनेक तर प्रतिकूल परिस्थितीतही मोठं यश संपादन करतात. सांगलीतील एका मजूर कुटुंबातील मुलगा युपीएससीची परीक्षा उत्तीर्ण झाला. त्याच्या या कामगिरीचं मोठं कौतुक केलं जात आहे.
उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्याचं नाव आहे प्रवीण कोळपे. सांगली जिल्ह्यातील आटपाडी तालुक्यातील जेमतेम दोन हजार लोकसंख्येच्या गावी प्रवीणचा जन्म झाला. त्याने याच गावातून जिल्हा परिषद शाळेत प्राथमिक शिक्षण पूर्ण केलं. त्यानंतर तालुक्याच्या ठिकाणी खरसुंडी येथे माध्यमिक शिक्षण पूर्ण केलं. मराठी माध्यमातून शिक्षण घेतलेल्या प्रवीणने कठीण परिश्रमाने आयपीएस अधिकारी झाला आहे. प्रवीण कोळपे हा देशात 584 वा क्रमांक मिळवत उत्तीर्ण झाला. प्रवीण कोळपे याने मोठ्या जिद्दीने सहाव्या प्रयत्नात युपीएससीचा शिखर सर केला.

बापाचं छत्र हरपलं, आईने मजुरी करून लेकाला बनवलं अधिकारी....
वडिलांचे छत्र हरपल्यानंतर प्रवीणच्या आईने शेतात मोलमजुरी करून प्रवीणचे शिक्षण पूर्ण केलं. प्रवीणने हे यश मिळवत आपल्या आई-वडिलांचं जिल्हाधिकारी होण्याचं स्वप्न पूर्ण केलं आहे. या यशानंतर प्रवीण याच्यावर कौतुकांचा वर्षाव होत असून नातेवाईक ग्रामस्थांकडून प्रवीण याचा सत्कार देखील करण्यात आला आहे. प्रवीणच्या आई आणि आजीकडून प्रवीणचे भरभरून कौतुक करण्यात येत आहे. नातू अधिकारी झाल्याने आता लाल दिव्याच्या गाडीतून मला फिरायचं आहे, अशी भावना प्रवीणच्या आजीने यावेळी व्यक्त केली. प्रवीणचे प्राथमिक शिक्षण त्याच्याच गावातील जिल्हा परिषद शाळेत झाले तर माध्यमिक शिक्षण शेजारी असणारे खरसुंडी गावांमधील सिद्धनाथ विद्यालयात झाले. महाविद्यालयीन शिक्षण सांगली येथील विलीगडन महाविद्यालयात झाले. विशेष म्हणजे स्पर्धा परीक्षेसाठी तो पुणे-मुंबईला गेला नाही. तर त्याने कराड येथे स्पर्धा परीक्षेचे धडे घेतले. प्राथमिक शाळेत असतानाच प्रवीणने आपण अधिकारी व्हायचं ठरवलं होतं. त्याने यासाठी कठीण परिश्रम घेतलं आणि आपलं ध्येय पूर्ण केलं.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world