रेवती हिंगवे, पुणे
Pune Crime News : अभियांत्रिकी विद्यालयात रात्री प्रश्नपत्रिका सोडवून घेतल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी एका प्राध्यापकाला आणि विद्यार्थ्यांना अटक करण्यात आली आहे. पुण्याच्या वाघोली परिसरात ही घटना घडली आहे. पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या युनिट सहाने हा प्रकार उघडकीस आणला आहे.
आरोपींकडून बीजगणिताच्या उत्तरपत्रिकांचे सहा बंडल, दोन लाख सहा हजार रुपये, उत्तरपत्रिका ठेवलेल्या कक्षाची किल्ली असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी प्राध्यापक प्रतिक किसन सातव यांच्यासह आदित्य यशवंत खिलारे, अमोल अशोक नागरगोजे, अनिकेत शिवाजी रोडे यांना अटक करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, प्राध्यापक सातव यांनी विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिका काढून घेतल्या आणि नवीन उत्तरपत्रिका पुन्हा लिहिण्यासाठी दिल्या. या प्रकरणात अटक केलेले आरोपी आदित्य खिलारे, अमोल नागरगोजे, अनिकेत रोडे हे अभियांत्रिकी शाखेत दुसऱ्या वर्षात शिक्षण घेत आहेत.
महाविद्यालयातील प्राध्यापक प्रतीक सातव हे सोमवारी (2 जून) दुपारी झालेल्या अभियांत्रिकी शाखेच्या पहिल्या वर्षातील बीजगणिताची (मॅथेमॅटिक्स 2) प्रश्नपत्रिका विद्यार्थ्यांकडून रात्री सोडवून घेणार आहेत, अशी माहिती पोलिसांना मिळाली. प्रा.सातव यांनी त्यासाठी विद्यार्थ्यांकडून मोठी रक्कम घेतल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांच्या पथकाने रात्री छापा टाकला.
त्यावेळी अभियांत्रिकी शाखेच्या प्रथम वर्षांतील आठ विद्यार्थ्यांकडून प्रश्नपत्रिका सोडवून घेण्यात येत असल्याचे आढळून आले. पोलिसांच्या पथकाने उत्तरपत्रिका ठेवलेल्या कक्षाची किल्ली त्यांच्याकडून जप्त केली. विद्यार्थ्यांकडून सोडवून घेतलेल्या उत्तरपत्रिकांची सहा बंडले, तसेच प्रा. सातव आणि साथीदारांकडून दोन लाख सहा हजार रुपये जप्त करण्यात आले. त्यानंतर प्रा. सातव यांच्यासह चौघांना अटक करण्यात आली.
नापास होण्याच्या भीतीने, विद्यार्थ्यांना फूस लावली
मुख्य आरोपी प्रा. प्रतीक सातव आणि साथीदारांनी ज्या विद्यार्थ्यांना बीजगणितात नापास होण्याची भीती वाटत होती, अशा विद्यार्थ्यांना निशाण्यावर ठेवले. सातव आणि साथीदारांनी विद्यार्थ्यांकडून प्रत्येकी 10 ते 50 हजार रुपये घेतले. सातव यांनी आधीच अभियांत्रिकी महाविद्यालयातील परीक्षा कक्षाची (कंट्रोल रूम) बनावट चावी तयार करवून घेतली. या चावीचा वापर करून बीजगणिताच्या उत्तरपत्रिकांचे सहा लाखबंद बंडल काढून घेतले. विद्यार्थ्यांनी सोडवलेल्या परत त्यांना सोडवण्यासाठी दिल्या.