पुणे-बारामतीला जोडणाऱ्या रस्त्यावर 9 डिसेंबर रोजी एक एसयूव्ही झाडाला धडकली होती. या अपघातात दोन प्रशिक्षणार्थी पायलटचा मृत्यू झाला होता. या अपघातात अन्य दोघेजण जखमी झाले होते. या अपघातात राजस्थानातील पोखरणची राहणारी चेष्टा बिश्नोई जखमी झाली होती. या अपघातानंतर चेष्टा कोमामध्ये होती.
नक्की वाचा - आई अन् मुलगा लाइफ जॅकेटसाठी बोटीच्या खाली गेले, पण..; मुंबई बोट अपघाताचं धक्कादायक वास्तव
17 डिसेंबर रोजी पुण्याच्या रुग्णालयात चेष्टाचा मृत्यू झाला आहे. यानंतर 18 डिसेंबर बुधवारी तिच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आलं. मात्र मृत्यूपूर्वी चेष्टाच्या नातेवाईकांनी तिचं अवयवदान करून अनेकांना नवजीवन दिलं आहे. जाता जाता आठ जणांना अवयवदान केल्यानं ती अवयवरुपी जिवंत राहिली आहे. यामध्ये चेष्टाचे हृदय, डोळे, किडनीसह आठ अवयव दान करण्यात आले आहेत.
चेष्टा पायलट होण्याच्या काही पावलं दूर होती. तिला दिलेल्या 200 तासांपैकी 68 तासांचं प्रशिक्षण पूर्ण झालं होतं. पोखरणच्या खेतोलाई गावाची निवासी चेष्टा अवघ्या 21 वर्षांची होती. 9 डिसेंबर रोजी पुण्यात पहाटेच्या वेळी झालेल्या अपघातात ती गंभीर जखमी झाली होती. यानंतर पुण्यातील रुग्णालयात तिच्यावर उपचार सुरू होते. मात्र मंगळवारी तिचा संघर्ष संपला. मात्र त्यानंतरही चेष्टाच्या आई-वडिलांनी धीर राखत आपल्या लेकीचे अवयवदान केलं आणि तब्बल आठ जणांना नवजीवन मिळवून दिलं.
नक्की वाचा - फिरायला आले, होत्याचं नव्हतं झालं... बोट दुर्घटनेत एकाच कुटुंबातील तिघांचा अंत
चेष्टाच्या भावाने सांगितलं की, चेष्टाचे हृदय, लिव्हर, दोन्ही किडन्या, स्वादुपिंड, डोळे दान करण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पुणे अपघातात चारही प्रशिक्षणार्थी पायलट कारने बारामतीहून भिगवणच्या दिशेने जात होते. या अपघातात तक्षू शर्मा आणि आदित्य कनासे यांचा मृत्यू झाला आहे. तर कृष्ण सिंह आणि चेष्टा बिश्नोई गंभीर जखमी झाल्या होत्या. यात चेष्टाचा मंगळवारी उपचारादरम्यान मृत्यू झाला.