राहुल कुलकर्णी, पुणे
Pune News: पुणे शहरातील कोंढवा परिसरात दहशतवाद विरोधी पथकाने (ATS) आणि पुणे पोलिसांनी संयुक्तपणे मध्यरात्रीपासून मोठे सर्च ऑपरेशन सुरू केले आहे. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, या कारवाईत काही संशयितांना ताब्यात घेण्यात आले आहे. या सर्च ऑपरेशनसाठी कोंढवा परिसरात मोठ्या प्रमाणावर पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
कोंढवा भागातील बंदोबस्तासाठी सुमारे पाचशेहून अधिक पोलीस कर्मचारी तैनात असावेत, असा अंदाज आहे.प्राथमिक माहितीनुसार, या कारवाईमध्ये जवळपास 350 पुणे पोलीस आणि ATS चे अधिकारी व कर्मचारी सहभागी आहेत.
(नक्की वाचा- Kanpur Blast: कानपूरमध्ये मोठा 'ब्लास्ट'; दाट वस्तीतील स्फोटाने बाजारपेठ हादरली, अपघात की कट?)
कोंढवा परिसरात दहशतवादी संबंधाची माहिती मिळाल्यानंतर एटीएस आणि पुणे पोलिसांनी तब्बल 19 ठिकाणी धाड टाकली. या दरम्यान अनेक संशयितांची चौकशी करण्यात आली आणि काही महत्त्वाचे पुरावेही मिळाले आहेत.
गुप्त माहितीच्या आधारे मध्यरात्रीपासून सकाळपर्यंत ही कारवाई सुरू होती. ज्या घरांवर छापे टाकण्यात आले, त्या ठिकाणांवरील लोकांची ओळख आणि पार्श्वभूमीची तपासणी करण्यात आली. पोलिस अधिकाऱ्यांनी हे राष्ट्रीय सुरक्षेशी संबंधित प्रकरण असल्याचे सांगितले आहे.
पोलीस आणि सुरक्षा यंत्रणांकडून या संवेदनशील विषयावर अत्यंत गोपनीय पद्धतीने तपास सुरू आहे. अधिकृत माहिती मिळाल्यानंतर पुढील तपशील समोर येतील.