
अविनाश पवार, पुणे
Pune News : पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातील खरपुडी गावात सैराट चित्रपटातील प्रसंगाला आठवण करून देणारी धक्कादायक घटना घडली आहे. एका आंतरजातीय विवाह केलेल्या दाम्पत्यावर हल्ला करत पत्नीचे अपहरण करण्यात आले आहे. या प्रकरणी खेड पोलीस ठाण्यात एकूण १५ जणांविरुद्ध गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, विश्वनाथ गोसावी आणि त्याची पत्नी प्राजक्ता गोसावी यांनी आंतरजातीय विवाह केला होता. प्रेमविवाह करून दोघेही खरपुडी येथे राहत होते. मात्र त्यांच्या नात्याला काही नातेवाईकांचा विरोध होता. रविवारी सायंकाळी प्राजक्ताच्या कुटुंबीयांनी गावात येऊन विश्वनाथला जबर मारहाण केली आणि प्राजक्ताचे अपहरण करून तिला घेऊन गेले.
(नक्की वाचा- Pune News: दलित मुलींचा पोलिसांकडून छळ! रात्रभर ठिय्या तरी तक्रार घेण्यास नकार, संपूर्ण प्रकरण काय?)
या प्रकरणी प्राजक्ताचा भाऊ, आई आणि इतर मिळून एकूण १५ जणांवर खेड पोलीस स्टेशनमध्ये अपहरण आणि गंभीर मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी याप्रकरणी तपास सुरू केला असून प्राजक्ताला शोधण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
(नक्की वाचा- Amravati News: महिला पोलिसाच्या हत्येचं गुढ उकललं; नवऱ्यानेच केली हत्या, संतापजनक कारण समोर)
या संपूर्ण प्रकारामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. सामाजिक तेढ आणि आंतरजातीय विवाहाच्या पार्श्वभूमीवर हे प्रकरण अधिक संवेदनशील बनले आहे. पोलीस अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, "घटनेच्या मुळाशी जाण्यासाठी तपास सुरू असून, संबंधित आरोपी लवकरच अटकेत घेतले जातील." सध्या पोलिसांकडून खरपुडी परिसरात अतिरिक्त बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world