रेवती हिंगवे, पुणे
शाळेत किरकोळ वादातून वर्गात विद्यार्थ्यांचा गळा चिरल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. शाळेतील वार्षिक समारंभामध्ये नववीतील विद्यार्थ्यांमध्ये झालेल्या वादानंतर ही घटना घडली आहे. विद्यार्थ्याचा वर्गातच पडलेल्या काचेच्या तुकड्याने गळा चिरण्यात आला आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
पुण्यातील हडपसर भागातील मांजरीमध्ये एका शाळेतील ही घटना आहे. याप्रकरणी 14 वर्षीय मुलावर हडपसर पोलीस ठाण्यात खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. या घटनेत 15 वर्षीय मुलगा जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
(नक्की वाचा- मामानेच मुलीची हत्या करून लावली मृतदेहाची विल्हेवाट, उल्हासनगरमधील चिमुकलीसोबत नेमकं काय घडलं?)
पोलिसांच्या माहितीनुसार, मांजरीतील शाळेत नववीत हल्ला झालेला मुलगा शिकायला आहे. गुन्हा दाखल झालेला मुलगा देखील त्याच्या वर्गात आहे. वार्षिक समारंभाच्या आयोजनावरुन दोघात वाद झाला होता. मंगळवारी अडीचच्या सुमारास मुलगा वर्गात बसलेला होता, तेव्हा दुसऱ्या मुलाने अचानक पाठीमागून येऊन काचेच्या तुकड्याने त्याच्या गळ्यावर वार केला.
(नक्की वाचा- फक्त 200 रूपयांची लाच घेणं भोवलं, थेट 6 वर्ष जेलमध्ये जावं लागलं)
या घटनेत मुलगा जखमी झाला असून शिक्षकांनी मुलाला तत्काळ रुग्णालयात दाखल केले. ज्या मुलाने वार केला, त्याने गळ्यावर वार केल्यानंतर देखील तो त्याला धमकावत होता. त्याला जीवे मारण्याची धमकी देत होता. याप्रकारणी पोलिसांनी 14 वर्षीय मुलाला ताब्यात घेतले आहे. हडपसर पोलीस या घटनेचा संपूर्ण तपास करत आहेत.