अविनाश पवार, पुणे
कल्याणमध्ये अल्पवयीन मुलीवर अत्याचार करुन हत्या केल्याचं प्रकरण ताजं असताना तसाच काहीसा प्रकार पुण्यात घडला आहे. पुण्यात दोन सख्ख्या बहिणींची हत्या केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. 8 वर्षीय आणि 9 वर्षीय मुलींची हत्या करण्यात आली आहे.
पुण्यातील राजगुरुनगर शहरातून बुधवारी दुपारी दोन लहान मुली (बहिणी) बेपत्ता झाल्या होत्या. दोन्ही मुलींचे मृतदेह आढळले आहेत. मुलींवर अत्याचार करण्याचा प्रयत्न करुन भितीपोटी त्यांची हत्या करण्यात आल्याचं पोलीस तपासात उघड झालं आहे.
(नक्की वाचा- हिंगोलीत पोलिसाचा स्वत:च्याच कुटुंबातील सदस्यांवर गोळीबार, पत्नीचा मृत्यू; अनेकजण जखमी)
मिळालेल्या माहितीनुसार, राजगुरुनगर शहरातील वाडा रोड परिसरातील राहणाऱ्या मकवाने कुटुंबाच्या घराच्या वर एक आचारी राहायला होता. त्यानेच या बहिणींची हत्या केल्याचं पोलीस तपासात उघड झालं आहे. आधी या आचाऱ्याने दोन्ही बहिणींना गोड बोलून स्वतःच्या घरात आणले. तिथेच त्याने सुरुवातीला एका बहिणीवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला.
मात्र तिने विरोध केला आणि आरडाओरडा करण्याचा प्रयत्न केला. आता आपलं बिंग फुटेल या भीतीने त्याने एका बहिणीचा जीव घेतला. त्यानंतर दुसरी बहिणीचाही तसाच जीव घेतला. मृतदेहांची विल्हेवाट लावण्यासाठी घरालगतच्या इमारतीजवळील ड्रममध्ये मृतदेह ठेवले.
(नक्की वाचा- VIDEO : आजारी पत्नीची काळजी घेण्यासाठी घेतली स्वेच्छानिवृत्ती, मात्र निरोप समारंभातच पत्नीचा मृत्यू)
राजगुरूनगर पोलिसांकडे सुरुवातीला अपहरणाचा गुन्हा दाखल होता. या प्रकरणी आचाऱ्याला बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. तर बहिणींचे मृतदेह शवविच्छेदन अहवालासाठी पुण्याच्या ससून रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत. या अहवालातून नेमकं काय-काय घडलं हे स्पष्ट होईल.