रेवती हिंगवे, पुणे
पुण्यातील वाढती गुन्हेगारी चिंतेचा विषय आहे. पुणे पोलीस देखील गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी प्रयत्न करत आहेत. गुन्हेगारांना कुणाचा वचक राहिला की नाही अशी परिस्थिती सध्या पुण्यात आहे. किरकोळ कारणावरून वाद आणि मारहाण होण्याच्या घटनांमध्ये देखील वाढ झालेली पाहायला मिळते. असंच एक प्रकरण समोर आलं आहे. केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या कार्यालयात काम करणाऱ्या तरुणाला गुंडांनी मारहाण केली आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
शिवजयंतीच्या दिवशी म्हणजेच 19 फेब्रुवारीला कोथरूड परिसरात असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यापासून मिरवणूक निघाली होती. त्यावेळी चार जणांनी बाईकवरुन जाणाऱ्या एकाला कट मारला. त्यावेळी या व्यक्तीने त्या चार जणांकडे रागाने बघितलं. तेव्हा त्यांच्यामध्ये वाद झाला आणि त्या चौघांनी मिळून त्या इसमाला बेदम मारहाण केली. देवेंद्र जोग असं केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या कार्यालयात काम करणाऱ्या तरुणाचं नाव आहे.
(नक्की वाचा- आमदार निवासातील घरांवरुन आमदारांमध्ये जुंपली; अनेक मंत्र्यांकडून सत्तेचा गैरवापर)
या प्रकरणी कोथरूड पोलीस स्टेशनमध्ये त्या चौघांविरोधात BNS कलम 307 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चार पैकी तीन आरोपींना कोथरूड पोलिसांकडून अटक करण्यात आलेली आहे तर एक आरोपी, जो खुख्यात गुंड गज्या मारणेचा भाचा आहे, तो फरार आहे. विशेष म्हणजे, हे चौघेजण कुख्यात गुंड गज्या मारणे याच्या टोळीतील आहेत.अमोल विनायक तापकीर, ओम तीर्थराम धर्म जिज्ञासू, किरण कोंडीबा पडवळ, आणि बाबू पवार (गजाचा भाचा) असे आरोपींचे नाव आहेत. ज्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
(नक्की वाचा- Crime News: क्राइम ब्रांचचा अधिकारी असल्याचा बनाव, 12 तरुणींवर अत्याचार, 'असा' अडकला लखोबा)
जर पुणे शहरातले मागील काही दिवसांमध्ये घडलेल्या घटना पाहिल्या तर पुणे शहर खरंच सुरक्षित आहे का? असा प्रश्न उपस्थित होतो. कारण फक्त रागाने बघितल्यामुळे मारहाण होणे, तर दुसरीकडे दहशत पसरवण्यासाठी गाड्यांची तोडफोड असे अनेक प्रकार सध्या शहरात वारंवार होत आहेत. आता पोलीस प्रशासन यावर आळा घालण्यासाठी काय करतील हे पाहण महत्वाचं आहे.