Pune News: सध्याच्या काळात घटस्फोटाच्या बातम्या काही नवीन राहिल्या नाहीत, पण पुण्यात घडलेली एक घटना मात्र भलतीच चर्चेत आली आहे. सहसा घटस्फोटावेळी पत्नीला पतीकडून पोटगी मिळते, पण इथे मात्र गंगा उलटी वाहिली आहे. स्वतःच्या सुटकेसाठी एका पत्नीने आपल्या पतीला चक्क 50,000 रुपये मोजले आहेत. ऐकायला हे एखाद्या चित्रपटाची कथा वाटत, तरी पुण्यातील कौटुंबिक न्यायालयात नुकताच हा अजब प्रकार घडला आहे.
गल्लीतलं प्रेम आणि कोर्टाची पायरी
पुण्यातील एकाच गल्लीत राहणाऱ्या एका तरुण आणि तरुणीचं सूत जुळलं. प्रेम इतकं घट्ट होतं की त्यांनी घरच्यांच्या विरोधात जाऊन पळून जाण्याचा धाडसी निर्णय घेतला.
19 एप्रिल 2024 रोजी या दोघांनी विशेष विवाह कायद्यानुसार कोर्ट मॅरेज केलं आणि संसाराची स्वप्नं पाहू लागले. मात्र, लग्नानंतरचं वास्तव वेगळंच निघालं. दोघांनाही स्वतंत्र राहणं आर्थिकदृष्ट्या परवडणारं नव्हतं, त्यामुळे तरुणीने शेवटी तिच्या घरच्यांना सर्व प्रकार सांगितला. अपेक्षेप्रमाणे घरच्यांनी या लग्नाला कडाडून विरोध केला आणि वादाला तोंड फुटलं.
( नक्की वाचा : Pune News आधी चारित्र्यावर शिंतोडे, मग DNA चाचणी आणि अखेर अंगावर काटा आणणारा निकाल; 'या' प्रकरणाने सर्व हादरले )
घरच्यांच्या दबावापुढे प्रेमाची हार
घरच्यांचा प्रचंड दबाव आणि सततचा विरोध यामुळे तरुणी पुरती हबकून गेली. तिने पतीसोबत राहण्याऐवजी पुन्हा माहेरी जाण्याचा निर्णय घेतला. पतीने तिला सोबत राहण्यासाठी खूप समजवण्याचा प्रयत्न केला, तो तिला नांदवायलाही तयार होता. मात्र, घरच्यांच्या दबावामुळे तरुणीने थेट घटस्फोटासाठी कौटुंबिक न्यायालयात धाव घेतली. या कायदेशीर लढाईत पतीला विनाकारण कोर्टाचे उंबरठे झिजवावे लागले आणि त्याचा वेळ अन् पैसा दोन्ही खर्च झाला.
अखेर 50 हजार रुपयांत सुटका
कोर्टातील सुनावणी दरम्यान पत्नीला पतीसोबत कोणत्याही परिस्थितीत राहायचे नव्हते. या कायदेशीर कचाट्यातून बाहेर पडण्यासाठी मग एक वेगळीच अट ठेवण्यात आली. पतीने कोर्टाच्या कामासाठी जो खर्च केला, तो खर्च म्हणून पत्नीने त्याला 50,000 रुपये द्यावेत, असे ठरले.
( नक्की वाचा : Kalyan News: सावधान! 5 लाखांच्या बदल्यात 7 लाख देतो म्हणाले अन् क्षणात होत्याचे नव्हते झाले; कल्याणमधील थरार )
नात्यातून मुक्त होण्यासाठी पत्नीने ही अट तत्काळ मान्य केली आणि पतीला 50,000 रुपये रोख देऊन घटस्फोटावर शिक्कामोर्तब केले. केवळ एका स्वाक्षरीसाठी आणि स्वातंत्र्यासाठी मोजलेली ही 50,000 रुपयांची किंमत सध्या सोशल मीडियावरही चर्चेचा विषय ठरत आहे.
बदलत्या नात्यांचं नवं वास्तव
पुण्यातील या प्रकरणाने नातेसंबंध आणि त्यातील व्यवहारावर मोठे प्रश्नचिन्ह उभे केले आहे. प्रेमासाठी घर सोडणाऱ्या या पिढीत, कौटुंबिक दबावामुळे त्याच प्रेमाचा लिलाव कसा होतो, हे यातून स्पष्ट दिसत आहे. पोटगी मागण्याऐवजी स्वतःहून पैसे देऊन नात्यातून बाहेर पडण्याचा हा मार्ग म्हणजे आधुनिक काळातील बदलत्या मानसिकतेचं जिवंत उदाहरण आहे. एका गल्लीतून सुरू झालेला हा प्रेमप्रवास अखेर 50,000 रुपयांच्या बदल्यात कोर्टाच्या आवारात कायमचा संपुष्टात आला आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world