Pune News: मृत्यूच्या दाढेतून सुटका! सिंहगडच्या खोल दरीत कोसळलेल्या डॉक्टर तरुणाला जीवदान

Pune News: सिंहगड किल्ल्याजवळील बुधलामाची परिसरात 350 फूट दरीत कोसळलेल्या डॉक्टर प्रशांत नदावते यांना हवेली आपत्ती व्यवस्थापन पथकाने सुखरूप बाहेर काढले.

जाहिरात
Read Time: 2 mins

अजिंक्य धायगुडे पाटील, पुणे

पुण्यातील प्रसिद्ध ट्रेकिंग मार्ग असलेल्या कात्रज टू सिंहगड मार्गावर शुक्रवारी दुपारी एक मोठी दुर्घटना घडली. सिंहगड किल्ल्याच्या परिसरात फिरण्यासाठी गेलेले डॉक्टर प्रशांत नदावते हे बुधलामाची परिसरात पाय घसरून सुमारे 300 ते 350 फूट खोल दरीत कोसळले. मात्र, नियतीला काहीतरी वेगळेच मान्य होते; इतक्या उंचावरून पडूनही डॉक्टरांचा जीव वाचला आणि एका धाडसी रेस्क्यू ऑपरेशनमुळे ते सुखरूप बाहेर आले.

नेमक काय घडलं?

डॉ. प्रशांत नदावते हे शुक्रवारी दुपारी 4 वाजता सिंहगड परिसर फिरण्यासाठी आले होते. सिंहगड घाटातील बुधलामाची परिसरात चालत असताना त्यांचा पाय घसरला आणि ते थेट खोल दरीत कोसळले. दरीत पडल्यानंतर काही वेळ ते बेशुद्ध होते. शुद्ध आल्यावर त्यांनी प्रसंगावधान राखत आपल्या मोबाईलवरून पोलीस कंट्रोल रूमला कॉल केला आणि स्वतःच्या लोकेशनची माहिती दिली.

Advertisement

(नक्की वाचा-  Pune Petrol Price Hike: इराण-इस्रायल युद्धाचा पुण्याला फटका; पेट्रोलच्या दरात मोठी वाढ)

दोन तासांचे थरारक रेस्क्यू ऑपरेशन

पोलीस नियंत्रण कक्षाकडून माहिती मिळताच हवेली पोलीस आणि स्थानिक आपत्ती व्यवस्थापन पथक घटनास्थळी दाखल झाले. हवेली आपत्ती व्यवस्थापन पथकाचे प्रमुख तानाजी भोसले यांच्यासह गणेश सपकाळ, संतोष जाधव, वैभव भोसले, कैलास जरांडे आणि पोलीस हवालदार समाधान चोरमले यांनी तातडीने दरीत उतरून शोधमोहीम सुरू केली. घनदाट झाडी आणि अवघड वळणे असूनही, पथकाने जवळपास दोन ते अडीच तास शर्थीचे प्रयत्न करून डॉक्टरांना दरीतून सुखरूप बाहेर काढले. त्यांना किरकोळ दुखापत झाली असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

(नक्की वाचा-  Ashok Kharat: कॅप्टन' खरातची चिंधीगिरी! कोट्यवधींची माया पण गरीब शेतकऱ्याला फसवलं; खळबळजनक आरोप)

सिंहगड आणि आजूबाजूच्या परिसरात सध्या हवामानातील बदलामुळे किंवा निसरड्या वाटांमुळे ट्रेकिंग करणे जोखमीचे ठरू शकते. मोबाईल चार्ज असणे आणि आपत्कालीन क्रमांक माहिती असणे डॉ. नदावते यांच्यासाठी जीवदान ठरले.
 

Topics mentioned in this article