- पुणे-मुंबई एक्सप्रेस वेवर टँकर अपघातामुळे प्रोपलिन गॅस लीक होऊन वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती
- अपघातामुळे राज्यातील विविध विभागांतील एकूण १३९ बस फेऱ्या रद्द करण्यात आल्या होत्या
- महामंडळाच्या १६३ वाहनांना वाहतूक कोंडीत अडकावे लागले आणि प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला
सागर कुलकर्णी
पुणे–मुंबई एक्सप्रेस वेवर झालेल्या टँकर अपघातामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. त्यामुळे महामार्गावर गाड्यांच्या लांबच लांब रागा लागल्याचं पाहायला मिळात होतं. दोन्ही बाजूनकडून ही वाहतूक कोंडी झाली होती. या घटनेचा थेट परिणाम महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या बस सेवांवर झाला आहे. अनेक बसेस त्यामुळे रद्द कराव्या लागल्या. प्रवाशांना त्याचा मोठा फटका बसला. वाहतूकच ठप्प असल्याने बसेस सोडण्यात आल्या नाहीत. उशिरा पर्यंत महामार्गावर ट्राफीक जामचीच स्थिती पाहायला मिळाली.
परिवहन विभागाकडून प्राप्त माहितीनुसार, या अपघातानंतर निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे राज्यातील विविध विभागांमधील एकूण 139 बस फेऱ्या रद्द करण्यात आल्या. यामध्ये 37 ई-शिवनेरी व 66 इतर बस फेऱ्यांचा समावेश आहे. तसेच, या एक्सप्रेस वेवर महाराष्ट्र राज्य परिवन विभागाची एकूण 163 वाहने वाहतूक कोंडीत अडकली होती. त्यामुळे प्रवाशांनाही अडकून पडावे लागले होते.
या बसेसमध्ये सातारा विभागातील 46, सोलापूर विभागातील 36, पुणे विभागातील 20, सांगली विभागातील 18, कोल्हापूर विभागातील 13, पालघर विभागातील 12, ठाणे विभागातील 11 आणि मुंबई विभागातील 7 वाहनांचा समावेश आहे. प्रवाशांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देण्यात येत असून, परिस्थितीचा आढावा घेऊन पर्यायी व्यवस्था उभारण्यात आल्या आहेत. वाहतूक सुरळीत होताच बस सेवा टप्प्याटप्प्याने पूर्ववत करण्यात येईल असं एसटी महामंडळाने स्पष्ट केले आहे.
मुंबई पुणे एक्सप्रेस वे वर गेल्या 23 तासां पेक्षा जास्त वेळापासून ट्राफीक जामची परिस्थिती आहे. त्यामुळे प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर गॅसचा टँकर पलटी झाला होता. त्यानंतर टँकरमधील प्रोपलिन गॅस लिक झाला होता. त्यामुळे सुरक्षेच्या कारणास्तव महामार्गावरील वाहतूक तात्काळ थांबवण्यात आली. त्यामुळे वाहतूक कोंडीची स्थिती निर्माण झाली होती.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world