अविनाश पवार, प्रतिनिधी
Pune News : पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील पिंपरखेड आणि जांबुत परिसरात गेल्या काही दिवसांपासून बिबट्याने प्रचंड दहशत माजवली आहे. फक्त तीन आठवड्यांत तीन जणांचा बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झाल्याने नागरिक संतप्त आहेत. सहा वर्षांची शिवण्या बोंबे, ७० वर्षांच्या भागुबाई जाधव आणि नुकताच तेरा वर्षांचा रोहन बोंबे या तीनही निरपराध जणांनी आपले प्राण गमावले. या सलग घटनांनंतर नागरिकांनी पुणे–नाशिक महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करत वनमंत्री गणेश नाईक यांनी प्रत्यक्ष घटनास्थळाची पाहणी करावी अशी मागणी केली होती.
या घटनांनंतर जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही रोहन बोंबे, यांच्या घरी भेट देत परिस्थितीचा आढावा घेतला. मात्र नागरिकांमधील भीती अजूनही कायम आहे. प्रत्येक रात्री गावात चुली विझल्यानंतर भीतीचं सावट पसरतं.
वन विभागाने याआधीच नागरिकांना जनजागृती करून अनेक सूचना दिल्या आहेत — शेतात वाकून काम करू नका, मोबाईलवर मोठ्याने गाणी ऐका, रात्री टॉर्च घेऊन जा, फटाके वाजवा, अशा सूचना देऊन सतत जनजागृती केली जात आहे. तरीदेखील बिबट्याच्या वाढत्या हल्ल्यांनी भीतीचं वातावरण कमी झालेलं नाही.
या पार्श्वभूमीवर स्थानिक शेतकऱ्यांनी स्वतःच एक वेगळा उपाय शोधला आहे. बिबट्याच्या हल्ल्यात पाळीव कुत्र्यांचा बचाव व्हावा म्हणून त्यांच्या गळ्यात खिळे असलेले पट्टे लावले जातात. हाच उपाय आता माणसांनी स्वतःसाठी वापरायला सुरुवात केली आहे.
नक्की वाचा - Pune News: बिबट्या चिमुकल्यावर हल्ल्याच्या तयारीत, कुत्रा बचावाला धावला, पुढे जे घडलं ते...
पिंपरखेड जांभूत आणि आसपासच्या गावांमध्ये काही महिला आणि पुरुष शेतकरी हे “खिळ्यांचे पट्टे” घालून शेतात काम करताना दिसतात. काहींच्या म्हणण्यानुसार, हा पट्टा गळ्यावर बिबट्याने झडप घातल्यास त्याला जखम होते, त्यामुळे तो मागे हटतो. “आम्ही भीतीत जगतो, पण या पट्ट्यामुळे थोडं सुरक्षित वाटतं,” असं एका महिला शेतकऱ्याचं म्हणणं आहे.
वन विभागाने या नव्या ट्रेंडकडे गांभीर्याने लक्ष दिलं असून, अधिकृतपणे अशा पट्ट्यांचा वापर मान्य नाही असं सांगण्यात आलं आहे. मात्र, स्थानिक पातळीवर नागरिक या उपायाकडे “स्वतःच्या सुरक्षेसाठी शेवटचा प्रयत्न” म्हणून पाहत आहेत.
दरम्यान, पिंपरखेड परिसरात बिबट्यांच्या वावरावर नियंत्रण ठेवण्यासाठी पिंजरे लावण्यात आले आहेत. रात्री शेतात जाणं टाळा, प्रकाशयोजना वाढवा आणि एकट्याने शेतात जाऊ नका, असा सल्ला वन विभागाने पुन्हा दिला आहे. दुसरीकडे अनेक नागरिक हे आता घराभोवती साडी बंद पिंजरे करू लागले आहेत म्हणजे बिबट्या हा मुक्त आहे आणि नागरिक मात्र पिंजऱ्यामध्ये जेरबंद झाल्याचे चित्र आहे
एकूणच बिबट्याचा हा संघर्ष आता फक्त प्राणी आणि मानव यांच्यात नाही, तर भीती आणि जगण्याच्या हक्कामधला संघर्ष बनला आहे — आणि या संघर्षात शेतकऱ्यांच्या गळ्यातील “खिळ्यांचा पट्टा” ही नव्या काळाची भयावह प्रतिमा ठरत आहे.