हवामान खात्याने पुणे जिल्ह्यासाठी मंगळवारी रेड अलर्ट जारी केला असून पुणे जिल्ह्यातील प्रमुख धरणांमधील पाणीसाठा गेल्या काही दिवसांत झपाट्याने वाढला आहे. धरण क्षेत्रात सातत्याने होत असलेल्या मुसळधार पावसामुळे धरणांच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली असून प्रशासन यामुळे सतर्क झाले आहे.
#पुणे जिल्ह्यात देण्यात आलेल्या #REDALERT च्या पार्श्वभूमीवर धरणातून पाणीसाठा नियंत्रित करण्याकरिता आज #मुळा, #मुठा व #पवना नदीपात्रात विसर्ग सोडण्याची शक्यता. @PMCPune व @pcmcindiagovin परिसरातील नागरिकांनी खबरदारी घ्यावी-संनियंत्रण अधिकारी, मध्यवर्ती पुरनियंत्रण कक्ष,पुणे pic.twitter.com/c0TP0SrFCO
— DISTRICT INFORMATION OFFICE, PUNE (@Info_Pune) July 15, 2025
एकीकडे होत असलेला पाऊस आणि दुसरीकडे झपाट्याने भरणारी धरणे यामुळे प्रशासनाने धरणातून पाण्याचा विसर्ग करण्यास सुरूवात करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे मंगळवारी म्हणजेच 15 जुलै रोजी खडकवासला धरणसाखळीतून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग करण्यात येणार असल्याचा इशारा दिला आहे. या विसर्गामुळे मुठा, मुळा आणि पवना नदीपात्रातील पाणीपातळी अचान वाढण्याची भीती आहे. यामुळे खडकवासला पाटबंधारे विभागाच्या मध्यवर्ती पूर नियंत्रण कक्षाने नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.
( नक्की वाचा: राज्यात अनेक ठिकाणी पावसाचं कमबॅक; मुंबई, पुण्यात काय आहे स्थिती? )
हवामान खात्याच्या अंदाजानुसार, पुणे जिल्ह्यात पुढील काही तासांत अतिवृष्टी होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर धरणातील पाणी पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी मोठ्या प्रमाणात विसर्ग करणे अटळ झाले आहे. पूर नियंत्रण कक्षाच्या संनियंत्रण अधिकारी श्वेता कऱ्हाडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर कायम राहिल्यास नदीतील विसर्ग टप्प्याटप्प्याने वाढवला जाऊ शकतो.
( नक्की वाचा: पुणेकरांसाठी महत्त्वाचं! शहरातील 'या' भागात गुरुवारी पाणीपुरवठा बंद )
या इशाऱ्यानंतर पुणे आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिका परिसरातील नदीकाठच्या रहिवाशांना सावध करण्यात आले आहे. नदीपात्रालगत असलेली वाहने, जनावरे किंवा इतर साहित्य तात्काळ सुरक्षित ठिकाणी हलवण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे. कोणत्याही प्रकारची जीवित वा वित्तहानी टाळण्यासाठी नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावे आणि नदीपात्रापासून दूर राहावे, असेही सांगण्यात आले आहे. प्रशासनाच्या सर्व संबंधित विभागांना आपत्कालीन परिस्थितीसाठी सज्ज राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता केवळ प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे असा सूचना देण्यात आल्या आहेत.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world