अजिंक्य धायगुडे-पाटील, प्रतिनिधी
Pune News : तुरुंगात राहून बंडू आंदेकर खून कशा पाडतो आणि त्याचे नेटवर्क पोलिसांपेक्षाही स्ट्राँग आहे का, या प्रश्नांनी सध्या संपूर्ण पुणे पोलीस दलात खळबळ उडवून दिली आहे. पुण्यातील टोळीयुद्ध आता अशा वळणावर पोहोचले आहे, जिथे कायद्याचा धाक उरला आहे की नाही, असा प्रश्न सर्वसामान्य नागरिक विचारू लागले आहेत. माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांची दीड वर्षांपूर्वी हत्या झाली आणि तिथूनच या रक्तरंजित खेळाची खरी सुरुवात झाली. या हत्येचा बदला घेण्यासाठी आंदेकर टोळीने आता असा एक पॅटर्न सुरू केला आहे, जो पोलिसांच्या कल्पनेपलीकडचा आहे.
तुरुंगातून रक्ताच्या खेळाचे सूत्रसंचालन
बंडू आंदेकर आणि त्याचे महत्त्वाचे साथीदार सध्या तुरुंगात आहेत, मात्र तिथूनही आंदेकर टोळीची सूत्रे हलवली जात असल्याचे गंभीर वास्तव समोर आले आहे. वनराज आंदेकर यांच्या हत्येतील मुख्य आरोपी सध्या कारागृहात आहेत, त्यामुळे त्यांना थेट टार्गेट करणे शक्य नसल्याने बंडू आंदेकरने सूडाचा एक वेगळाच मार्ग निवडला आहे.
आरोपींच्या कुटुंबातील सदस्यांना आणि त्यांच्या जवळच्या नातेवाईकांना संपवून वनराजच्या हत्येचा बदला घेतला जात आहे. धक्कादायक बाब म्हणजे, बंडू आंदेकर आणि कृष्णा आंदेकर हे तुरुंगात बसून फोनद्वारे बैठका घेत असल्याचा खळबळजनक आरोप कल्याणी कोमकर यांनी केला आहे. हे जर खरे असेल, तर तुरुंग प्रशासनाच्या कार्यक्षमतेवरही मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
( नक्की वाचा : Pune News : पुणे महापालिकेत थेट 'मुन्नाभाई' स्टाईल भरती; पालिकेचा लोगो, शिक्के अन् ट्रेनिंग लेटरही, पण सत्य... )
नेटवर्क पोलिसांपेक्षाही वेगवान
पुणे पोलिसांची गुन्हे शाखा आणि स्थानिक पोलीस गँगवॉर रोखण्यासाठी प्रयत्न करत असल्याचे सांगितले जाते, मात्र आंदेकर टोळीचे नेटवर्क पोलिसांपेक्षाही सरस असल्याचे अलीकडच्या घटनांवरून दिसून येते. ज्या पद्धतीने बुधवारी सकाळी 10 वाजता भररस्त्यात अक्षय म्हस्केवर 5 गोळ्या झाडण्यात आल्या, ते पाहता मारेकऱ्यांना अक्षयच्या प्रत्येक हालचालीची माहिती आधीच होती, हे स्पष्ट होते.
तुरुंगात बसलेला गुन्हेगार बाहेरच्या हालचालींवर इतक्या अचूकपणे नियंत्रण मिळवतो आणि आदेश देतो, ही बाब पोलिसांच्या गुप्तचर यंत्रणेचे अपयश अधोरेखित करणारी आहे.
( नक्की वाचा : Pune News : पुणे महापालिकेत थेट 'मुन्नाभाई' स्टाईल भरती; पालिकेचा लोगो, शिक्के अन् ट्रेनिंग लेटरही, पण सत्य... )
सूडाच्या मालिकेतील तिसरे कांड
वनराज आंदेकरच्या हत्येनंतर आंदेकर टोळीने सुरू केलेले हे तिसरे मोठे कांड आहे. यापूर्वी आंदेकर टोळीने गणेश कोमकरचा मुलगा आयुष कोमकर याची हत्या केली होती. त्यानंतर समीर काळेचा भाऊ गणेश काळे यालाही संपवण्यात आले. आता नाशिक कारागृहात असलेल्या आकाश म्हस्केचा भाऊ अक्षय म्हस्के याला टार्गेट करण्यात आले आहे.
आरोपी तुरुंगात असल्याने त्यांच्या कुटुंबीयांना संपवून त्यांना मानसिक आणि कौटुंबिक धक्क्याने उद्ध्वस्त करण्याचा हा नवा गँगवॉर पॅटर्न पुण्यासाठी अतिशय घातक ठरत आहे.
पुणे पोलिसांच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह
बालाजीनगर गोळीबार प्रकरणी आता बंडू आंदेकरसह त्याच्या टोळीवर गुन्हे दाखल झाले असून 6 जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. मात्र, जोपर्यंत जेलमधून चालणाऱ्या या फोन मीटिंग्स आणि नेटवर्कवर पोलीस नियंत्रण मिळवत नाहीत, तोपर्यंत पुण्याचे रस्ते रक्ताने माखले जाणे थांबणार नाही. बंडू आंदेकरचे नेटवर्क नेमके कोण चालवत आहे आणि त्याला जेलमध्ये कोणाचे पाठबळ मिळत आहे, याचा शोध घेणे आता पुणे पोलिसांसमोरचे सर्वात मोठे आव्हान आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world