अविनाश पवार, प्रतिनिधी
पुण्यातील मॉडेल कॉलनीतील 'शेठ हिराचंद नेमचंद जैन दिगंबर बोर्डिंग'च्या जैन बोर्डिंग संदर्भातील वाद अधिकच गडद होत चालला आहे. या प्रकरणात एक धक्कादायक बाब पुढे आली असून बोर्डिंग परिसरातील जैन मंदिरच गहाण ठेवून तब्बल ७० कोटी रुपयांचा व्यवहार केल्याचं समोर आलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार, कोणतीही चौकशी न करता ८ ऑक्टोबर रोजी बिरेश्वर क्रेडिट सोसायटी (कर्नाटक) यांनी ५० कोटी रुपये आणि बुलढाणा अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक यांनी २० कोटी रुपये देऊन हा व्यवहार पूर्ण केल्याचे उघड झाले आहे.
या संदर्भात विद्यार्थी चंद्रकांत पाटील याने सोशल मीडियावर एक पोस्ट केल्यानंतर या प्रकरणाने नवे वळण घेतलं. त्यांच्या या पोस्टनंतर त्याला कर्नाटकातून पोलिसांचे धमकीचे फोन आले. अगदी व्हॉट्सअॅपवर नोटीसही पाठविण्यात आली. १८ ऑक्टोबर रोजी कर्नाटक पोलीस कर्मचारी यांना ताब्यात घेण्यासाठी पुण्यात आले होते. मात्र त्यांच्या सोबत असलेल्या अॅड. योगेश पांडे यांनी “मंदिर गहाण ठेवण्यास कायदेशीर परवानगी कशी दिली?” असा सवाल उपस्थित करत कायदेशीर तरतुदींचा अभाव असल्याचे निदर्शनास आणून दिले. त्यानंतर पोलीस परत गेले.
या सर्व घडामोडींमुळे आता जैन बोर्डिंग ट्रस्टच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. मंदिरासारख्या धार्मिक स्थळाला गहाण ठेवून व्यवहार केल्याची बाब समोर आल्यानंतर जैन समाजात आणि पुणेकरांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.
नक्की वाचा - Pune News : पुण्याच्या मॉर्डन कॉलेजमुळे मराठी तरुणानं लंडनमधील नोकरी गमावली? प्राचार्यांनी दिलं उत्तर
या प्रकरणातील महत्त्वाचे मुद्दे..
८ ऑक्टोबरला मंदिर गहाण ठेवून ७० कोटींचा व्यवहार
सोशल पोस्ट करणाऱ्या विद्यार्थ्याला धमक्या
अॅड. पांडे यांनी पोलिसांसमोर कायदेशीर आक्षेप घेतला
धार्मिक स्थळ गहाण ठेवल्याने समाजात संताप
काय आहे प्रकरण?
पुण्यातील मॉडेल कॉलनी परिसरातील जैन बोर्डिंगची जागा आणि मंदिर काही विश्वस्तांनी बेकायदेशीरपणे विकल्याचा आरोप केला जात आहे. यावरुन जैन समाजामध्ये तीव्र संताप पसरला आहे. शुक्रवारी यासंदर्भात मोर्चाही काढण्यात आला होता.