Pune News: खेडमधील दाम्पत्याला मारहाण-अपहरणाची घटना; अवघ्या 24 तासात प्रकरणाला वेगळं वळण

या प्रकरणातील पीडित पती विश्वनाथ गोसावी आणि प्राजक्ता यांनी आंतरजातीय प्रेमविवाह केला होता. लग्नानंतर ते दोघे खरपुडी येथे राहत होते.

जाहिरात
Read Time: 2 mins

Pune News : पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातील खरपुडी गावात आंतरजातीय विवाह केलेल्या दाम्पत्यावर हल्ला झाल्याची आणि पत्नीचे अपहरण झाल्याची धक्कादायक घटना समोर आल्यानंतर, या प्रकरणात एक मोठे वळण आले आहे. अपहरण झालेली पत्नी प्राजक्ता गोसावी ही स्वतः तिच्या कुटुंबीयांसोबत खेड पोलीस स्टेशनला हजर झाली.

या प्रकरणी पोलीस उपविभागीय अधिकारी अमोल मांडवे यांनी दिलेल्या माहितीनुसार, प्राजक्ताने पोलिसांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, "माझे अपहरण झाल्यानंतर कुटुंबीयांनी मला समजावले. आता आमच्यातील कटुता संपली असून, ते माझ्या पतीला स्वीकारतील." या विधानामुळे दोन्ही कुटुंबांमध्ये समेट होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

(नक्की वाचा-  Pune News: नवऱ्याला बेदम मारहाण, बायकोचं अपहरण; खेडमध्ये भरदिवसा सिनेस्टाईल थरार)

नेमकी काय घडली होती घटना?

या प्रकरणातील पीडित पती विश्वनाथ गोसावी आणि प्राजक्ता यांनी आंतरजातीय प्रेमविवाह केला होता. लग्नानंतर ते दोघे खरपुडी येथे राहत होते. रविवारी सायंकाळी प्राजक्ताचे कुटुंबीय आणि इतर काही लोकांनी गावात येऊन विश्वनाथला जबर मारहाण केली आणि प्राजक्ताचे अपहरण केले होते. या घटनेनंतर खेड पोलीस ठाण्यात प्राजक्ताचा भाऊ, आई आणि इतर मिळून एकूण 15 जणांविरोधात अपहरण आणि गंभीर मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

(नक्की वाचा-  Amravati News: महिला पोलिसाच्या हत्येचं गुढ उकललं; नवऱ्यानेच केली हत्या, संतापजनक कारण समोर)

आरोपींना न्यायालयात हजर केले जाणार

प्राजक्ताने स्वतः हजर होऊन समेटाची भूमिका घेतली असली, तरी पोलिसांनी कायद्यानुसार पुढील कार्यवाही करण्याचा निर्णय घेतला आहे. अपहरणाच्या तक्रारीनुसार, संबंधित आरोपींना उद्या न्यायालयात हजर केले जाईल. त्यानंतर न्यायालय जो निर्णय देईल, त्याप्रमाणे पुढील कार्यवाही करण्यात येईल, असे पोलिसांनी स्पष्ट केले आहे. विशेष म्हणजे, उद्याच या दाम्पत्याचा लग्नाचा वाढदिवस आहे.

Advertisement

Topics mentioned in this article