Pune Lohagad Murder Case : पुण्यातील प्रसिद्ध रिअल इस्टेट व्यावसायिक केतन अग्रवाल मृत्यू प्रकरणात एक नवी माहिती उघड झाली आहे. लोणावळ्याजवळील ऐतिहासिक लोहागड किल्ल्यावर ट्रेकिंग दरम्यान दरीत कोसळून केतनचा मृत्यू झाल्याचा दावा त्याची भावी बायको सिया गोयल हिने केला होता. वरवर अपघाती वाटणाऱ्या या घटनेमागे एक अतिशय थंड डोक्याने रचलेला पूर्वनियोजित कट होता, ज्याचा उलगडा आता झाला आहे. हायटेक गुन्हेगारीच्या या काळात पोलिसांच्या तांत्रिक तपासापूर्वीच एका बहिणीच्या तीक्ष्ण नजरेने आणि एका साध्या प्रश्नाने या संपूर्ण हत्याकांडाचा पर्दाफाश केला आहे.
सियाचं खोटं कसं पकडलं?
केतन अग्रवालचा लोहागड किल्ल्यावरील दरीत कोसळून मृत्यू झाल्यानंतर सुरुवातीला या घटनेकडे एक दुर्दैवी अपघात म्हणूनच पाहिले जात होते. मात्र, केतनच्या अंतिम संस्काराला 4 दिवस उलटल्यानंतर संशयाची पहिली ठिणगी पडली. सिया गोयल ही केतनच्या घरी सांत्वन करण्यासाठी आली असताना, केतनच्या बहिणीने तिच्याकडे त्या दिवशी नेमके काय घडले, दोघे तिथे कसे पोहोचले आणि दुर्घटना कशी झाली, याबाबत सविस्तर चौकशी सुरू केली.
या संवादादरम्यान सियाने दिलेली उत्तरे अत्यंत विसंगत, संदिग्ध आणि एकमेकांना छेद देणारी होती. सियाच्या बोलण्यातील हाच संशयास्पद बदल केतनच्या बहिणीने तातडीने ओळखला आणि कुटुंबाने थेट पोलिसांकडे धाव घेतली. बहिणीच्या याच सतर्कतेमुळे या थरारक हत्याकांडाचे रहस्य जगासमोर आले.
( नक्की वाचा : Pune News : आधी पासपोर्ट चोरीला, मग लोहगडावर नेलं..केतनच्या वडिलांनी सांगितलं सियानं कसं केलं होतं हत्येचं प्लॅनिंग )
प्रेमसंबंधातून मर्डरचा प्लॅन
पोलिसांनी या संशयाच्या आधारे तपास सुरू केला असता, सिया गोयल आणि तिचा प्रियकर चेतन चौधरी यांच्यातील काळे कृत्य समोर आले. तपासात समोर आले की, सिया आणि चेतन हे गेल्या 3 वर्षांपासून एकमेकांच्या संपर्कात होते. या दोघांनी केतनला वाटेतून हटवण्यासाठी अत्यंत नियोजनबद्ध कट रचला होता.
या वर्षी म्हणजेच जानेवारी ते जून या 6 महिन्यांच्या कालावधीत सिया आणि चेतन यांच्यात तब्बल 2004 वेळा फोनवर संभाषण झाले होते. एकूण 238 तास हे दोघे एकमेकांशी बोलत होते. पकडले जाऊ नये म्हणून सामान्य कॉलऐवजी ते अनेकदा फेसटाइम आणि व्हॉट्सॲप कॉलचा वापर करत असल्याचेही पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे.
( नक्की वाचा : 'बबीता पांडेला पऱ्या घेऊन गेल्या?'...27 दिवसांपासून बेपत्ता तरुणीचं गूढ वाढलं! वाचा का होतीय ही चर्चा )
चौथ्या प्रयत्नात घेतला केतनचा जीव
केतन अग्रवाल हा अवघ्या 26 वर्षांचा होता आणि त्याचे सियासोबत लग्न ठरले होते. मात्र, त्याला जीवानिशी मारण्याचा हा पहिलाच प्रयत्न नव्हता. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सिया आणि चेतन यांनी यापूर्वी किमान 3 वेळा केतनचा खून करण्याचा प्रयत्न केला होता, मात्र ते प्रयत्न अपयशी ठरले. अखेर 18 जून रोजी लोहागड किल्ल्याच्या दुर्गम भागात त्यांनी केतनला गाठले आणि दरीत ढकलून देऊन चौथी खेळी यशस्वी केली.
अपघाताचा हुबेहूब बनाव रचून सिया जवळपास सुटलीच होती, परंतु केतनच्या बहिणीच्या एका चौकस प्रश्नाने तिचा हा क्रूर डाव उधळून लावला. सध्या पुणे ग्रामीण पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.