Pune News: शासकीय आदेशानुसार आपले कर्तव्य बजावण्यासाठी घरातून निघालेल्या एका शिक्षिकेवर काळाने भीषण झडप घातल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मावळ येथील जुन्या पुणे-मुंबई महामार्गावरील कान्हे फाटा परिसरात एका भरधाव कंटेनरने दिलेल्या जोरदार धडकेत महिला शिक्षिकेचा जागीच मृत्यू झाला. दीपाली सुजित तांबे असे मृत पावलेल्या दुर्दैवी शिक्षिकेचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, दीपाली तांबे यांच्याकडे जनगणनेचे शासकीय काम सोपवण्यात आले होते. 27 मे रोजी याच शासकीय कामासाठी त्या घरातून निघाल्या होत्या. मात्र, जुन्या पुणे-मुंबई महामार्गावरून जात असताना कान्हे फाटा परिसरात एका भरधाव कंटेनरने त्यांच्या वाहनाला अत्यंत जोरदार धडक दिली.
(नक्की वाचा- पुणे पोर्शे अपघात प्रकरणात; अग्रवाल कुटुंबाचा माज कायम! जेलमधून बाहेर आल्यानंतरचा संतापजनक VIDEO व्हायरल)
जागीच प्राण ज्योत मालवली
हा रस्ता अपघात इतका भीषण आणि थरारक होता की, यामध्ये गंभीर दुखापत झाल्याने दीपाली तांबे यांचा घटनास्थळावरच मृत्यू झाला. अपघात घडताच स्थानिक नागरिक आणि महामार्ग पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. मात्र, तोपर्यंत उशीर झाला होता.
देशाच्या आणि शासनाच्या कामासाठी कर्तव्यावर जात असतानाच शिक्षिकेचा असा दुर्दैवी अंत झाल्याने त्यांच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या हृदयद्रावक घटनेमुळे केवळ मंचर किंवा मावळ परिसरामध्येच नाही, तर संपूर्ण राज्यातील शिक्षण वर्तुळात मोठी शोककळा पसरली आहे.
(नक्की वाचा- Pune Jamavbandi: पुण्यात आज रात्रीपासून 14 दिवस जमावबंदी लागू! महापालिकेकडून गाईडलाईन्सही जारी)
कंटेनर चालकाविरोधात गुन्हा दाखल
या घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला असून मृतदेह रुग्णालयात पाठवला आहे. याप्रकरणी पोलिसांनी अपघाताची अधिकृत नोंद केली असून, अपघातानंतर संबंधित कंटेनर चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world