जाहिरात

Pune Rain: मावळमध्ये घरावर कोसळली दरड, संपूर्ण कुटुंब ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती

पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यातील पाटण गावात एका घरावर दरड कोसळल्याची घटना घडली आहे. या दुर्घटनेत घरातील संपूर्ण कुटुंब ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे.

Pune Rain: मावळमध्ये घरावर कोसळली दरड, संपूर्ण कुटुंब ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती

अजिंक्य धायगुडे, पुणे

पुण्यात सुरु असलेल्या मुसळधार पावसादरम्यान अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे. मावळ तालुक्यातील पाटण गावात आज, 6 जुलै रोजी पहाटेच्या सुमारास एका घरावर डोंगराची दरड कोसळल्याची माहिती समोर आली आहे. या भीषण दुर्घटनेत संबंधित घरातील संपूर्ण कुटुंब ढिगाऱ्याखाली अडकल्याची प्राथमिक माहिती आहे. 

स्थानिक प्रशासनाकडून तातडीने बचावकार्य सुरू

पुणे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी यांनी दिलेल्या अधिकृत माहितीनुसार, दरड कोसळल्याची दुर्घटना घडताच मावळचे तहसीलदार आणि स्थानिक आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा तात्काळ घटनास्थळी दाखल झाली. ढिगाऱ्याखाली अडकलेल्या नागरिकांना बाहेर काढण्यासाठी स्थानिक पातळीवर तातडीने बचावकार्य सुरू करण्यात आले आहे.

(नक्की वाचा-  Mumbai-Pune Expressway: मुंबई-पुणे महामार्गावरील वाहतूक ठप्प; रेल्वे वाहतूकही विस्कळीत)

NDRF ची 30 जवानांची टीम घटनास्थळाकडे रवाना

घटनेचे गांभीर्य आणि मुसळधार पाऊस लक्षात घेता, प्रशासनाने राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाची (NDRF) मदत मागितली आहे. पुणे येथील 5व्या बटालियनकडून तात्काळ प्रतिसाद देत विशेष पथक तैनात करण्यात आले आहे. हे बचावकार्य निरीक्षक रविंदर यांच्या थेट नेतृत्वाखाली आणि सहाय्यक कमांडंट चंद्रकेतू शर्मा यांच्या देखरेखीखाली राबवले जात आहे. या पथकामध्ये एकूण 30 सदस्यांचा समावेश आहे, ज्यामध्ये 1 अधिकारी, 2 वरिष्ठ अधिकारी आणि 27 अत्याधुनिक जवान आहेत. पथक ढिगारा हटवण्यासाठी लागणाऱ्या सर्व आवश्यक आपत्ती व्यवस्थापन आणि जीवरक्षक साहित्यांसह आज सकाळी 5.30 वाजता पाटण गावाकडे रवाना झाले आहे.

(नक्की वाचा-  Mumbai Rain LIVE: मुंबई पुण्यात पावसाचा हाहाकार! मिसिंग लिंकवर दरड कोसळली; वाचा लाईव्ह अपडेट्स)

मुसळधार पावसामुळे अडथळे

सध्या घटनास्थळी मदत आणि बचावकार्य वेगाने सुरू आहे. सुदैवाने, अद्यापपर्यंत प्रशासनाकडून कोणतीही जीवितहानी झाल्याची अधिकृत नोंद करण्यात आलेली नाही. मात्र, पुणे जिल्हा आणि मावळ परिसरात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे आणि दुर्गम भागामुळे बचावकार्यात मोठ्या प्रमाणावर अडथळे निर्माण होत आहेत.
 

संपूर्ण बातमी वाचा

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com