Pune Mumbai Expressway News: मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर आडोशी बोगद्याजवळ गॅस टँकर उलटल्याने मुंबईकडे जाणारी वाहतूक पूर्णपणे ठप्प झालीय. या अपघातानंतर टँकरमधून गॅस गळती सुरू झाल्याने सुरक्षेच्या कारणास्तव दोन्ही बाजूची वाहतूक थांबवण्यात आली होती. याचा फटका हजारो प्रवाशांना बसला आहे. मुंबईच्या दिशेने येणारे रुग्ण, ज्येष्ठ नागरिक आणि लहान मुलांचे प्रचंड हाल झाले. रुग्णांमध्ये कॅन्सरग्रस्तांचाही समावेश आहे. दुसरीकडे या महाकोंडीमुळे ट्रान्सपोर्ट क्षेत्राचे तब्बल 20 कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. TOIने यासंदर्भातील वृत्त दिलंय.
(नक्की वाचा: Raj Thackeray: 'प्रवाशांचा टोल परत करा', एक्स्प्रेसवे जाम, राज ठाकरे संतापले! म्हणाले, 'कोडगेपणा अनाकलनीय')
ट्रान्सपोर्ट क्षेत्राचे मोठे नुकसान
मिळालेल्या माहितीनुसार, हा टँकर केरळमधील कोची येथून गुजरातला जात होता. बोगद्याजवळील उतारावर चालकाचे नियंत्रण सुटल्याने टँकर उलटला आणि गॅस गळती सुरू झाली. खबरदारीचा उपाय म्हणून पोलिसांनी वाहतूक रोखली, ज्यामुळे महामार्गावर अनेक किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. एसटी महामंडळालाही याचा मोठा फटका बसलाय, 73 ई-शिवनेरीसह एकूण 139 बस फेऱ्या रद्द कराव्या लागल्या.
(नक्की वाचा: Kolhapur Traffic: मुंबई-पुणेनंतर आणखी एक महामार्ग ठप्प! ट्रक उलटल्याने वाहतूक खोळंबली; वाहनांच्या रांगा)

Photo Credit: PTI
वाहतूक कोंडीमुळे प्रवाशांची मोठी गैरसोय
वाहतूक कोंडी इतकी भयंकर होती की, वाहनांची सुमारे 20 किलोमीटर लांब रांग लागली होती. या अडचणीमुळे महिला आणि मुले यांच्यासह प्रवाशांना अन्न, पाणी आणि शौचालयाची सोय उपलब्ध होऊ शकली नाही. एमएसआरडीसीच्या अधिकाऱ्याने सांगितले की, अपघातस्थळावरून वायू टँकर हटवल्यानंतर मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवरील वाहतूक उशीरा रात्री 1.46 (AM) वाजता पूर्ववत करण्यात आली. टँकर हटवण्यात आल्यानंतरही येथील वाहतूक कोंडी जैसे थेच आहे. या घटनेमुळे दूध आणि भाज्या यासारख्या जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठाही विस्कळीत झालाय.
ही गंभीर परिस्थिती हाताळण्यासाठी एनडीआरएफ, एसडीआरएफ, भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (बीपीसीएल), महामार्ग पोलीस आणि एमएसआरडीसीच्या पथक घटनास्थळी तैनात करण्यात आले होते.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world