Pune News: चला मुंबईला! हिंजवडी ते मुंबई प्रवासातील दीड तासाचा अडथळा दूर होणार; वाचा ST चा नवा प्लॅन!

Hinjewadi Mumbai ST Bus:  पुणे आणि मुंबई दरम्यान प्रवास करणाऱ्यांसाठी एक अत्यंत महत्त्वाची आणि आनंदाची बातमी समोर येत आहे.

जाहिरात
Read Time: 3 mins
Hinjewadi Mumbai ST Bus: या थेट बसमुळे पुणेकरांचा दीड तास वाचणार आहे.
मुंबई:

Hinjewadi Mumbai ST Bus:  पुणे आणि मुंबई दरम्यान प्रवास करणाऱ्यांसाठी एक अत्यंत महत्त्वाची आणि आनंदाची बातमी समोर येत आहे. दररोजच्या प्रवासात वाहतूक कोंडीमुळे होणारा मनस्ताप आता लवकरच कमी होणार आहे. पुणे शहर आणि वाकड परिसरातील ट्रॅफिकचा अडथळा टाळण्यासाठी थेट हिंजवडी आयटी पार्कपासून मुंबईसाठी एसटी बस सेवा सुरू करण्याच्या हालचालींना वेग आला आहे. एसटी प्रशासनाच्या या नियोजित निर्णयामुळे प्रवाशांचा प्रवासातील तब्बल 90 मिनिटांचा म्हणजेच दीड तासाचा मोलाचा वेळ वाचणार आहे.

प्रवाशांचा दीड तास वाचणार

सध्या पुणे-मुंबई दरम्यान प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठी आहे. एसटी महामंडळाच्या ई-शिवनेरी आणि ई-शिवाई बस स्वारगेट किंवा पुणे स्टेशन येथून सुटतात. मात्र, पुणे शहरात प्रवेश केल्यानंतर वाकडपासून स्वारगेटपर्यंत पोहोचण्यासाठी प्रवाशांना प्रचंड वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो. 

बऱ्याचदा मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर गर्दी नसली तरी पुण्याच्या अंतर्गत रस्त्यांवरील कोंडीमुळे बसला स्वारगेटपर्यंत पोहोचण्यासाठी दीड ते दोन तास लागतात. हिंजवडीतून थेट बस सुरू झाल्यास प्रवाशांना या कोंडीत अडकण्याची गरज उरणार नाही आणि त्यांचा प्रवास अधिक वेगवान होईल.

(नक्की वाचा : Mumbai-Pune : साडेतीन तासांचा प्रवास मिनिटांवर येणार; मुंबई-पुणे हाय-स्पीड रेल्वेचा असा आहे प्लॅन )
 

एसटी महामंडळाचा नवा प्रस्ताव

पुणे विभागातून सध्या दादर, बोरिवली आणि ठाण्यासाठी ई-बसच्या दिवसाला 124 फेऱ्या होतात. मात्र, ही सर्व सेवा मुख्य शहरातून चालवली जाते. आयटी क्षेत्रात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची आणि वाकड परिसरातील रहिवाशांची मागणी लक्षात घेऊन आता एसटी महामंडळाने हिंजवडीतून थेट सेवा सुरू करण्याचा प्रस्ताव तयार केला आहे. 

Advertisement

प्रवाशांनी सातत्याने केलेल्या मागणीनंतर प्रशासनाने यावर सकारात्मक पाऊल उचलले असून, यामुळे मुंबईला जाणाऱ्या आयटीयन्सना मोठा दिलासा मिळणार आहे.

( नक्की वाचा : Pune News: पुणेकरांना बुलेट ट्रेनचे डबल गिफ्ट! मुंबई आणि हैदराबादचा प्रवास सुसाट, वाचा तुमचं स्टेशन आणि माहिती )

मेट्रो आणि एसटीचा असा होणार मेळ

या नव्या सुविधेचा सर्वात मोठा फायदा मेट्रो कनेक्टिव्हिटीमुळे होणार आहे. हिंजवडी ते शिवाजीनगर ही मेट्रो लाईन 3 येत्या मार्च अखेरपर्यंत सुरू होण्याची शक्यता आहे. ही मेट्रो मार्गिका जिल्हा न्यायालयाच्या स्थानकाशी जोडली जाणार असल्याने पिंपरी-चिंचवड, रामवाडी आणि स्वारगेट असा मोठा भाग मेट्रो जाळ्याशी जोडला जाईल. 

अशा स्थितीत हिंजवडी येथेच एसटीचे स्वतंत्र स्थानक किंवा थांबा निर्माण केल्यास, प्रवासी मेट्रोने हिंजवडीपर्यंत येतील आणि तिथून थेट मुंबईची बस पकडू शकतील. यामुळे शहरातील अंतर्गत वाहतूक कोंडी पूर्णपणे टाळता येईल.

Advertisement

प्रवासाचे नवे समीकरण

 हा प्रस्ताव प्रत्यक्षात आला, तर प्रवाशांना पुण्यातील मध्यवर्ती भागातील गर्दीतून जावे लागणार नाही. हिंजवडीतून बस सुटल्यानंतर ती थेट हायवेला लागेल, ज्यामुळे प्रवासाचा वेळ किमान 1 तास ते 90 मिनिटांनी कमी होईल. ही सेवा सुरू झाल्यास मुंबई-पुणे प्रवासाचे समीकरण बदलणार असून, सार्वजनिक वाहतुकीचा वापर करणाऱ्या नोकरदार वर्गासाठी ही मोठी पर्वणी ठरेल. एसटी प्रशासन आता या प्रस्तावावर कधी शिक्कामोर्तब करते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Topics mentioned in this article