Pune Crime News: लग्नाच्या वरातीत नाचण्याचा वाद, तरुणाला तडफडवून संपवलं

पुण्याच्या वेल्हे तालुक्यातील एका लग्नाच्या वरातीत नाचण्यावरून झालेल्या वादाचा बदला घेण्यासाठी, कात्रजमध्ये 24 वर्षीय तेजस पिलाणे या तरुणाची निर्घृण हत्या करण्यात आली.

जाहिरात
Read Time: 2 mins

Pune News: एका जुन्या वादाचा वचपा काढण्यासाठी पुण्यातील कात्रज परिसरात एका 24 वर्षीय तरुणाची धारदार शस्त्राने हत्या करण्यात आली. तेजस दत्तात्रय पिलाणे असे मृताचे नाव असून, तो चायनीज फूड स्टॉल चालवायचा. भारती विद्यापीठ पोलिसांनी या प्रकरणाचा वेगाने तपास करत चारही आरोपींच्या मुसक्या आवळल्या.

मध्यरात्री पाठलाग करून हल्ला

ही घटना शुक्रवारी पहाटे दीड वाजेच्या सुमारास कात्रज येथील शिवसृष्टी गड चौकाजवळील सर्व्हिस रोडवर घडली. तेजस त्याच्या स्टॉलवर काम करणाऱ्या आचाऱ्याला सोडून दुचाकीवरून घरी परतत होता. त्यावेळी आरोपींनी आपल्या दुचाकीने तेजसच्या गाडीला जोरदार धडक दिली. तेजस खाली पडताच, दबा धरून बसलेल्या आरोपींनी त्याच्यावर धारदार शस्त्रांनी सपासप वार केले. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या तेजसला रुग्णालयात नेण्यात आले, मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

Advertisement

(नक्की वाचा-  VIDEO: पुण्यात वसुलीवरून राडा! हडपसरमध्ये भररस्त्यात एजंट आणि ग्राहकाची हाणामारी)

वेल्हे तालुक्यातील वादाचा सूड 

भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल खिलारे यांनी दिलेल्या माहितीनुसार, या हत्येचे मूळ 14 मार्च रोजी झालेल्या एका वादात होते. वेल्हे तालुक्यातील कोंढावळे गावात एका लग्नाची वरात निघाली होती. या वरातीत नाचण्यावरून तेजस आणि आरोपींमध्ये जोरदार भांडण झाले होते. याच भांडणाचा राग मनात धरून आरोपींनी तेजसचा काटा काढण्याचे नियोजन केले.

(नक्की वाचा- Pune News: पुणे हादरलं! दारूच्या नशेत चोरली PMPML बस आणि सुसाट सुटला; FC रोडवर हजारो जीव टांगणीला)

सीसीटीव्ही नसतानाही पोलिसांना लावला छडा

ज्या ठिकाणी हत्या झाली, तिथे सीसीटीव्ही कॅमेरे नव्हते. मात्र, पोलिसांनी मोबाईल लोकेशन आणि सोशल मीडिया अकाऊंट्सचा वापर करून आरोपींचा माग काढला. आरोपी शिरवळ येथे लपून बसल्याचे समजताच पोलिसांनी तिथे धाड टाकून त्यांना ताब्यात घेतले. पोलिसांनी विशाल दत्तात्रय खोपडे, अभिषेक दिलीप खोपडे, सचिन हरिचंद्र धुळे, आदिनाथ शिवाजी कसबे या आरोपींना अटक केली आहे. पोलीस अधिक तपास करत आहेत. 
 

Topics mentioned in this article