यशपाल सोनकांबळे, प्रतिनिधी
Pune News: पुण्यातील सर्वात गजबजलेल्या फर्ग्युसन कॉलेज रोडवर आज (शनिवारी, 25 एप्रिल 2026) संध्याकाळी एका फिल्मी थराराने पुणेकरांची पाचावर धारण बसली. कोणतीही अधिकृत ओळख नसलेल्या एका मद्यधुंद तरुणाने चक्क पीएमपीएमएल (PMPML) बस चोरली आणि ती भररस्त्यात बेदरकारपणे धावू लागली. दारूच्या नशेत असलेल्या या तरुणाने बसचे स्टेअरिंग हातात घेऊन रस्त्यावरील वाहनांना उडवण्याचा प्रयत्न केल्याने परिसरात प्रचंड खळबळ उडाली. सुदैवाने, पुणेकरांच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला असून पोलिसांनी या 'तोतया' चालकाला बेड्या ठोकल्या आहेत.
नेमकं काय घडलं?
शनिवारी संध्याकाळी फर्ग्युसन कॉलेज रोडवर नेहमीप्रमाणे मोठी गर्दी होती. अशातच एक पीएमपीएमएल बस अचानक अत्यंत वेगात आणि वेड्यावाकड्या पद्धतीने धावू लागल्याने लोकांचे लक्ष गेले. ही बस चालवणारी व्यक्ती मद्याच्या नशेत तर होतीच, पण तिला बसवर कोणतेही नियंत्रण राखता येत नव्हते.
बसने रस्त्यावरील अनेक दुचाकी आणि चारचाकी वाहनांना अत्यंत धोकादायक पद्धतीने कट मारले. काही वाहनांना त्याने थेट धडक देण्याचाही प्रयत्न केला. हा सगळा प्रकार पाहून पादचाऱ्यांनी जीव वाचवण्यासाठी बाजूला धाव घेतली.
( नक्की वाचा : Pune News: नोटांचे नंबर सांगून भुरळ घालणारा पुण्याचा बाबा पोलिसांच्या जाळ्यात; दिग्गजांची धास्ती वाढली !)
संतापलेला जमाव आणि मद्यधुंद चोरट्याला चोप
बसचा वेग आणि ड्रायव्हरची वर्तणूक पाहून हा ड्रायव्हर नसल्याचा संशय काही नागरिकांना आला. त्यांनी धाडस दाखवून बस अडवली आणि चालकाच्या केबिनमध्ये बसलेल्या व्यक्तीला खाली खेचले. ही व्यक्ती शुद्धीत नव्हती आणि तिने बस चोरल्याचे लोकांच्या लक्षात आले. या बेजबाबदार कृत्यामुळे संतापाचा उद्रेक झाला आणि जमावाने या मद्यधुंद तरुणाला रस्त्यावरच चांगलाच चोप दिला. बघता बघता तिथे मोठी गर्दी जमली आणि काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती.
पोलिसांच्या तपासात धक्कादायक वास्तव उघड
घटनेची माहिती मिळताच डेक्कन पोलीस ठाण्याचे पथक तातडीने घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी जमावाला शांत करून संबंधित व्यक्तीला आपल्या ताब्यात घेतले. पोलिसांनी केलेल्या प्राथमिक चौकशीत एक धक्कादायक माहिती समोर आली. ही व्यक्ती पीएमपीएमएलचा कर्मचारी किंवा चालक नसून ती एक सामान्य नागरिक आहे. मद्यधुंद अवस्थेत त्याने कुठूनतरी उभी असलेली रिकामी बस चोरली आणि ती थेट फर्ग्युसन कॉलेज रोडवर आणली. या व्यक्तीचे नाव अद्याप समजू शकले नसून तिची वैद्यकीय तपासणी करण्यात येत आहे.
( नक्की वाचा : Nashik News :नाशिक TCS च्या इंजिनिअरला 'शीरखुरमा'तून दिले अंमली पदार्थ? धर्मांतरासाठी काळ्या जादूचा वापर! )
एखादी अनोळखी व्यक्ती सार्वजनिक वाहतुकीची बस चोरून शहराच्या मध्यवर्ती भागात कशी आणू शकते, याबद्दल आता गंभीर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. डेक्कन पोलिसांनी याप्रकरणी सार्वजनिक सुरक्षेला धोका निर्माण करणे, चोरी आणि निष्काळजीपणे वाहन चालवणे या कलमांखाली गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. पीएमपीएमएल प्रशासनानेही या घटनेची गंभीर दखल घेतली असून बस नक्की कुठून आणि कशी चोरीला गेली, याचा शोध घेतला जात आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world