Pune News: पुण्यातील खडकवासला येथील 'नॅशनल डिफेन्स अकॅडमी' (NDA) मधून एक मन सुन्न करणारी बातमी समोर आली आहे. अकॅडमीमध्ये नियमित सुरू असलेल्या शारीरिक प्रशिक्षणादरम्यान एका 17 वर्षीय तरुण कॅडेटचा अचानक मृत्यू झाला आहे. अभिनव बाजपेयी असे या कॅडेटचे नाव असून, तो अवघ्या काही दिवसांपूर्वीच भारतीय सैन्यात अधिकारी बनण्याचे स्वप्न घेऊन एनडीएमध्ये दाखल झाला होता. या अचानक झालेल्या मृत्यूमुळे एनडीए प्रशासनासह संरक्षण वर्तुळात मोठी हळहळ व्यक्त केली जात आहे.
24 जूनलाच घेतला होता प्रवेश
मिळालेल्या माहितीनुसार, अभिनव बाजपेयी हा उत्तर प्रदेशातील कानपूर येथील रहिवासी होता. अत्यंत कठीण परीक्षा उत्तीर्ण केल्यानंतर, त्याने देशाच्या सेवेसाठी सज्ज होण्याच्या उद्देशाने अवघ्या काही दिवसांपूर्वी, म्हणजेच 24 जून रोजी एनडीएच्या नवीन बॅचमध्ये प्रवेश घेतला होता.
शुक्रवारी सकाळी त्याची पहिली अधिकृत शारीरिक प्रशिक्षण (PT) परेड सुरू होती. या नियमित ट्रेनिंग सत्रादरम्यान धावत असताना किंवा व्यायाम करत असताना त्याला अचानक छातीत अस्वस्थ वाटू लागले. काही सेकंदातच तो शुद्ध हरपून मैदानावर खाली कोसळला.
(नक्की वाचा- Ashadhi Wari 2026 Live Tracker: पालखी सध्या कुठे? एका क्लिकवर करा चेक, पुणे पोलिसांचे 24 तास 'स्मार्ट' नियोजन)
उच्चस्तरीय चौकशीचे आदेश
मैदानावर उपस्थित असलेल्या प्रशिक्षकांनी आणि सहकाऱ्यांनी अभिनवला तात्काळ खडकवासला येथील मिलिटरी हॉस्पिटलमध्ये दाखल केले. लष्करी डॉक्टरांच्या विशेष पथकाने त्याचे प्राण वाचवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले आणि तातडीने वैद्यकीय उपचार सुरू केले. मात्र, दुर्दैवाने डॉक्टरांच्या प्रयत्नांना यश आले नाही आणि उपचारादरम्यानच अभिनवची प्राणज्योत मालवली. डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
कडक शारीरिक क्षमता असलेल्या तरुण कॅडेटचा अशा प्रकारे अचानक मृत्यू झाल्याने लष्करी प्रशासनाने या घटनेची गंभीर दखल घेतली आहे. अभिनवच्या मृत्यूचे नेमके कारण काय होते? त्याला पूर्वी काही आरोग्याच्या समस्या होत्या की हृदयविकाराचा झटका आला? या सर्व बाजू तपासण्यासाठी एनडीए प्रशासनाकडून अधिकृतपणे उच्चस्तरीय चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत.