सूरज कसबे
पिंपरी-चिंचवड शहरात रविवारी एकाच दिवसात पीएमपीएमएलच्या (PMPML) दोन बसना आग लागल्याचा धक्कादायक घटना घडल्या आहेत. सुदैवाने दोन्ही घटनांमध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र एकाच दिवशी दोन बसना आग लागल्यामुळे प्रवाशांमध्ये मात्र भितीचे वातावरण आहे. ही आग नक्की कशामुळे लागली याची चर्चा सध्या शहरात चांगलीच रंगली आहे. त्यामुळे या पुढे PMPML च्या बसमध्ये बसायचं की नाही असा विचार शहरातले नागरिक करत आहे. याबस प्रवासासाठी सुरक्षित आहे का? असा प्रश्न निर्माण झाला आहे.
सकाळच्या सुमारास पिंपरीमध्ये एका बसने अचानक पेट घेतला. बसमध्ये 15 प्रवासी प्रवास करत होते. चालकाच्या सतर्कतेमुळे मोठी दुर्घटना टळली. चालकाला इंजिनमधून धूर येत असल्याचे लक्षात आले. त्यानंतर त्याने तात्काळ बस थांबवली. तातडीने त्याने सर्व प्रवाशांना खाली उतरायला सांगितलं. चालकाने केलेल्या सुचनेनंतर सर्व प्रवाशी जलदगतीने बसमधून खाली उतरले. शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे. त्यानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले. पण बसचे मोठे नुकसान झाले.
तर दुसरी घटना काळेवाडी या भागात घडली. दिवसभरातील बसला आग लागण्याची ही दुसरी घटना होती. सायंकाळी काळेवाडी येथे ही घटना घडली. ही बस मेंटेनन्ससाठी शिवाजीनगर येथून निगडीकडे नेण्यात येत होती. त्याच वेळी त्या बसने अचानक पेट घेतली. या घटनेतही कोणतीही जीवितहानी झाली नाही. दरम्यान एकाच दिवशी दोन बस पेटल्यामुळे "पीएमपीएमएलच्या बस खरंच सुरक्षित आहेत का ?" असा गंभीर प्रश्न आता नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. पीएमपीएमएलच्या तातडीच्या देखभालीवर आणि सुरक्षिततेच्या उपाययोजनांवर लक्ष देण्याची मागणी जोर धरू लागली आहे.
पुणे असो की पिंपरी चिंचवड असो PMPML च्या बस या नागरिकांची पहिली पसंती आहे. कुठे ही जायचे असेल तर याबसला प्रथम प्राधान्य दिलं जातं. पण याच बसला आता आग लागल्यामुळे नागरिकांमध्ये भितीचं वातावरण आहे. त्यामुळे आता PMPML बस बाबत प्रशासन गांभिर्याने निर्णय घेईल. त्यात जर काही त्रुटी असतील तर त्या दुर केल्या जाव्यात अशी मागणी आता नागरिक करत आहेत.