रेवती हिंगवे
पुण्यातील कोंढवा परिसरात दहशदवादी विरोधी पथकाने (ATS) ऑक्टोबर मध्ये 19 वेगवेगळ्या ठिकाणी छापेमारी केली होती. त्या दरम्यान ATS ने जवळपास 18 ते 20 इलेक्ट्रॉनिक उपकरणे जप्त केले होते. त्यामध्ये लॅपटॉप आणि मोबाईल फोन होते. या छापेमारीत एक संशयित दहशदवादी झुबेर हंगरगेकरला अटक करण्यात आली होती. या आरोपीची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली. त्यानंतर त्याच्या चौकशीत अनेक धक्कादायक बाबी समोर येत आहेत. सगळ्यात पहिले माहिती अशी समोर आली की झुबेर हंगरगेकरकडे असलेल्या लॅपटॉपमध्ये आणि त्याच्या कोंढव्यातील घरात अनेक आक्षेपार्ह पुस्तक सापडली आहे. शिवाय काही महत्वाचा डेटा मिळून आला आहे. त्याचा दहशदवादी संघटना अल कायदा इन इंडियन सब काँटीनेंट याच्याशी संबंध आहे. तर त्याचाकडे अनेक पुस्तके होती. ज्यामध्ये बॉम्ब बनवण्याची प्रक्रिया, दहशदवादी ओसामा बिन लादेनची अनेक भाषणं होती. ही भाषण भाषांतर केलेली होती. या सह अजून काही गोष्टी तपासात उघड झाल्या आहेत.
धक्कादायक म्हणजे पुढील तपासात असं निष्पानं झालं की झुबेर हंगरगेकच्या जुन्या मोबाईल हँडसेटमध्ये एकूण पाच आंतरराष्ट्रीय मोबाईल नंबर मिळून आले आहेत. ज्यामध्ये पाकिस्तान , सौदी अरेबिया, ओमान, आणि कुवेत अशा देशांचे नंबर सेव होते. तर नवीन मोबाईल फोनमध्ये ओमान आणि सौदी अरेबियाचे नंबर होते. या बद्दल त्याला विचारणा केली असता त्याने या बद्दल काही माहिती देण्यास नकार दिल्याचं ही समोर आलं आहे. हा मोबाईल तो स्वत: वापरत होता. झुबेर हंगरगेकरची कुंडली आता हळू हळू समोर येऊ लागली आहे.
त्यावरून एक अंदाज बांधता येतो की मोठ्या प्रमाणावर आणि अनेक वर्षांपासून तो या दहशदवादी संघटनेशी संलग्नित आहे. झुबेर हंगरगेकरने सोलापूर मधल्या सोशल असोसिएशन उर्दू हायस्कूल मधून शिक्षण घेतलं. त्यानंतर त्याने B.E. केलं. तो इंजिनिअर झाला. ही पदवी त्याने सोलापूरच्या वालचंद इंस्टिट्यूट ऑफ टेक्नोलॉजी मधून घेतली. त्यानंतर 2015 मध्ये त्याचा संबंध दहशदवादी संघटनेशी आला. पुण्यातील कल्याणीनगर आणि हिंजवडी मध्ये असलेल्या नामांकित IT कंपनी मध्ये तो कामाला होता. या दरम्यान त्याने अनेक पुस्तकं गोळा केली. ज्यामध्ये बॉम्ब बनवण्याचं, IED बनवणे, एकटे हल्ले करणे, आणि गनिमी शैली कसे करायचे याची सविस्तर माहिती त्यामध्ये होती.
त्याने दहशदवादी कट्टरपंथी साहित्य वाचायला सुरुवात केली होती. शिवाय त्याचा प्रचार आणि प्रसार ही केला. इतकंच नसून त्याने मुंबई, पुणे, ठाणे या शहरांमधल्या विद्यार्थ्यांना देखील या गोष्टीचा प्रचार आणि प्रसार केला. त्यांना वारंवार शरिया कायदा कसा बरोबर आहे, लोकशाही कशी चुकीची आहे, हे सांगत देश विरोधी कारवाया तो करत होता. त्याने विद्यार्थ्यांसोबत त्याचा घरच्यांना ही हे पटवून दिलं. तरुणांना जिहाद करण्याचा मार्ग यावर व्याख्यानं देखील दिल्याचं आता समोर आलं आहे. या मध्ये ATS अधिक तपास करत आहे. अजून अनेक धक्कादायक गोष्टी समोर येतील असा अंदाज बांधला जात आहे. या मध्ये झुबेरची मदत कोण करत होतं? त्याचा घरच्यांना या बाबत माहिती होत का? त्याला पैसे कोण पुरवत होत? त्या आंतरराष्ट्रीय मोबाईल नंबरचा काय संबंध आहे? अशा अनेक प्रश्नांची उत्तर अजूनही अनुत्तरीत आहेत.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world