अविनाश पवार, प्रतिनिधी
Pune News : पुणे ग्रामीण पोलिसांच्या अमली पदार्थविरोधी मोहिमेत जुन्नर पोलिसांना मोठं यश मिळालंय. जुन्नरमधील बंद असलेल्या अहिल्यादेवी होळकर शाळा क्रमांक 4 च्या परिसरात छापा टाकत पोलिसांनी तब्बल 3 किलो गांजा जप्त केला आहे. या कारवाईत इनोव्हा कार, ॲक्टिव्हा स्कूटर आणि इतर मुद्देमालासह साडेदहा लाख रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी एका आरोपीला अटक करण्यात आली असून दोन आरोपी फरार आहेत.
३ किलोचा गांजा जप्त...
जुन्नर पोलिसांच्या रात्रगस्त पथकाला संशयास्पदरित्या उभ्या असलेल्या इनोव्हा कार आणि ॲक्टिव्हा स्कूटरची माहिती मिळाली. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी छापा टाकला. झडतीमध्ये कारमधून आणि घटनास्थळावरून फरार झालेल्या आरोपींच्या ॲक्टिव्हा स्कूटरमधून असा एकूण 3 किलो गांजा जप्त करण्यात आला.
या कारवाईत 10 लाख 50 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी मयूर संजय खराडे याला अटक करण्यात आली असून न्यायालयाने त्याला तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. तर या गुन्ह्यातील आणखी दोन आरोपी फरार असून त्यांचा शोध सुरू आहे. जुन्नर पोलीस ठाण्यात एनडीपीएस कायद्याच्या कलम ८(सी), २०(बी), २०(बी)(ii) तसेच भारतीय न्याय संहिता कलम ३(५) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.