Pune News: पुण्याच्या हडपसर भागातील मगरपट्टा परिसरातून एक सुन्न करणारी घटना समोर आली आहे. गृहनिर्माण संस्थेच्या आवारात खेळत असताना लोखंडी घसरगुंडी डोक्यावर पडल्याने एका चार वर्षांच्या चिमुरडीचा मृत्यू झाला. या प्रकरणी हडपसर पोलिसांनी सोसायटीचे अध्यक्ष आणि इतर पदाधिकाऱ्यांविरुद्ध निष्काळजीपणाचा गुन्हा दाखल केला आहे.
काय आहे नेमकी घटना?
मगरपट्टा येथील नोबल हॉस्पिटलजवळील 'वेद विहार' सोसायटीत 7 एप्रिल रोजी दुपारी 12.30 च्या सुमारास ही घटना घडली. मयत चिमुरडीचे नाव अनिका नवनाथ देविस्कर (वय 4) असे आहे. अनिका सोसायटीच्या मैदानात खेळत असताना, तिथे बसवण्यात आलेली जड लोखंडी घसरगुंडी अचानक तिच्या अंगावर आणि डोक्यावर कोसळली. या अपघातात अनिका गंभीर जखमी होऊन बेशुद्ध पडली. तिला तातडीने खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला.
(नक्की वाचा- Aurangpura Renamed: छत्रपती संभाजीनगरमधील औरंगपुराचं नाव बदललं; महापालिकेत नामांतराचा प्रस्ताव मंजूर)
वारंवार इशारा देऊनही दुर्लक्ष
अनिकाचे वडील नवनाथ देविस्कर यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, सोसायटी प्रशासनाचा निष्काळजीपणा या मृत्यूला कारणीभूत आहे. घसरगुंडी योग्य पद्धतीने उभारण्यात आली नव्हती, ज्यामुळे ती कधीही पडू शकत होती. घसरगुंडी धोकादायक असल्याचे आणि ती काढून टाकण्याची विनंती पालकांनी सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांना वारंवार केली होती. वारंवार सांगूनही पदाधिकाऱ्यांनी कोणतीही कारवाई केली नाही, ज्याचा परिणाम एका निष्पाप जीवाचा बळी जाण्यात झाला. पुणेकर न्यूजने याबाबतचं वृत्त प्रसिद्ध केलं आहे.
हडपसर पोलिसांनी या तक्रारीची गंभीर दखल घेतली असून सोसायटीचे अध्यक्ष आणि इतर जबाबदार पदाधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.