- बदलापूरमधील स्त्रीबीज तस्करी प्रकरणात सात जणांना पोलिसांनी अटक केली आहे.
- बारामतीतील श्री चैतन्य टेस्ट ट्यूब सेंटरशी या प्रकरणाचा संबंध जोडला जात आहे
- राज्य महिला आयोगाने प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे
देवा राखुंडे
स्त्रीबीज तस्करी प्रकरण बदलापूरमध्ये उघड झाले होते. त्यानंतर एकच खळबळ उडाली होती. या प्रकरणात आता नवनवीन अपडेट पुढे येत आहेत. राज्य महिला आयोगाने याप्रकरणी गंभीर दखल घेतलेली आहे. या प्रकरणाची पाळेमुळे आता थेट बारामतीपर्यंत पोहोचली आहेत का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. या प्रकरणात आतापर्यंत पोलिसांनी सात जणांना अटक केली आहे. बारामती मधील श्री चैतन्य टेस्ट ट्यूब सेंटरशी या प्रकरणाचे धागेदोरे जोडले जात आहेत.
ज्या एजंट महिलांना पोलिसांनी या प्रकरणात ताब्यात घेतल आहे, त्या महिलांकडे पोलिसांनी केलेल्या चौकशीत धक्कादायक माहिती समोर आली आहे. या महिलांना बारामती मधील श्री चैतन्य टेस्ट ट्यूब बेबी सेंटरमध्ये पाठवलं जात होतं. स्वतः राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी यासंदर्भातील माहिती दिली आहे. या संदर्भात आम्ही बारामतील श्री चैतन्य टेस्ट बेबी सेंटरचे डॉक्टर आशिष जळक यांना भेटण्याचा प्रयत्न केला.
मात्र त्यांची भेट झाली नाही. फोनवरून झालेल्या संभाषणानुसार डॉक्टर जळक यांनी होत असलेले आरोप नाकारले आहेत. राज्य सरकारने राज्यातील 708 मान्यताप्राप्त IVF सेंटरची चौकशी करा असे आदेश दिलेले आहेत. त्या आदेशानुसार दोन दिवसांपूर्वी आरोग्य विभाग आणि पोलीस खात्याचे अधिकारी माझ्या हॉस्पिटलला आले होते असं जळक यांनी सांगितले. त्यांनी 2022 पासूनचे माझ्या रुग्णालयाची असणारे सर्व कागदपत्र तपासली असल्याची माहिती ही डॉ. जळक यांनी दिली.
त्यामध्ये जर पुढे काही अनियमितता असेल तर मला पुढे चौकशीला बोलावलं जाईल, मात्र बदलापूर प्रकरणाशी जो संबंध जोडला जातोय किंवा रूपाली चाकणकर यांनी जी प्रतिक्रिया दिलेली आहे, त्या अनुषंगाने माझ्याकडे अद्याप पर्यंत कोणतीही चौकशी झालेली नाही, असा दावा श्री चैतन्य टेस्ट ट्यूब बेबी सेंटरचे डॉ.आशिष जळक यांनी केला आहे. त्यामुळे चाकणकर यांनी केलेला दावा आणि डॉ. जळक यांनी दिलेली माहिती यावरून सत्य काय अशी विचारणा बारामतीकर करत आहेत.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world