- एमआयटी महाविद्यालयातील वर्ल्ड कल्चरल फेस्टिवलमध्ये बांगलादेशी विद्यार्थ्यांच्या झेंड्यांच्या स्टिकर्सवरून वाद
- भाजप युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी बांगलादेशी विद्यार्थ्यांच्या स्टॉलवर तोडफोड केली आहे
- दोन्ही गटांत झालेल्या संघर्षामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे
सूरज कसबे
कोथरुड येथील एमआयटी महाविद्यालयात आयोजित वर्ल्ड कल्चरल फेस्टिवलमध्ये मोठा राडा झाला आहे. फूड फेस्टिवलमध्ये बांगलादेशी विद्यार्थ्यांनी लावलेल्या झेंड्यांच्या स्टिकर्सवरून वाद निर्माण झाला आहे. ज्याचे रूपांतर नंतर तोडफोडीत झाले. या घटनेमुळे कॅम्पसमध्ये काही काळ तणावाचे वातावरण होते. अखिल भारतीय युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी हा राडा केल्याचं समजत आहे. या घटनेनंतर फेस्टिवलच्या ठिकाणी एकच गोंधळाचं वातावरण निर्माण झालं होतं.
एमआयटी कॉलेजमध्ये दरवर्षीप्रमाणे विविध देशांतील संस्कृतीचे दर्शन घडवणारा सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यात सहभागी झालेल्या बांगलादेशी विद्यार्थ्यांनी आपल्या खाद्यपदार्थांच्या स्टॉलवर बांगलादेशच्या झेंड्याचे स्टिकर्स लावले होते. या स्टिकर्सवर काही विद्यार्थ्यांनी तीव्र आक्षेप घेतला. या वादाचे पर्यवसान आंदोलनात झाले. भाजप युवा मोर्चाशी संबंधित असल्याचा दावा करणाऱ्या काही कार्यकर्त्यांनी आणि विद्यार्थ्यांनी तिथे धाव घेत बांगलादेशचे झेंडे असलेले स्टिकर जाळल्याचा आरोप आहे.
संतापलेल्या आंदोलकांनी बांगलादेशी विद्यार्थ्यांचे फूड स्टॉल्स पाडून तिथे तोडफोड केली. यावेळी दोन्ही गटांत बाचाबाची झाल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. घटनेची माहिती मिळताच पुणे पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर परिस्थिती नियंत्रणात आणली. पोलिसांनी दोन्ही बाजूंना शांत राहण्याचे आवाहन केले आहे. सध्या कॅम्पसमध्ये पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. सध्याच्या स्थितीत तेथे तणाव पूर्ण शांतता आहे.
दरम्यान कॉलेज प्रशासनाने झालेली घटना ही चुकीची असून आम्ही या घटनेचा निषेध करत असल्याचे म्हटले आहे. संबंधित संघटनेच्या कार्यकर्त्यांनी चुकीच्या माहितीच्या आधारे हे कृत्य केलं , याबाबत रीतसर तक्रार सुद्धा केली असल्याचं स्पष्टीकरण दिले आहे. जर हा वर्ल्ड कल्चरल फेस्टिवल असेल. त्यात बांगलादेशींना निमंत्रित करण्यात आले असेल तर तिथे स्टॉल लावलेल्या बांगलादेशी विद्यार्थ्यांची काय चूक असा प्रश्न ही निर्माण होत आहे. भारत आणि बांगलादेश यांच्यातील सध्याचे संबंध लक्षात घेता त्यांना भारतात येण्याची परवानगीच कशी देण्यात आली अशी ही चर्चा सुरू आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world