- पुण्यातील येरवडा जेलमध्ये एका कैद्यावर १५ डिसेंबर रोजी भयंकर हल्ला झाला, होता
- या हल्ल्यातील आरोपींनी फरशीचा वापर करून विशाल कांबळे याच्यावर हल्ला केला, ज्यामुळे त्याला गंभीर जखम झाली
- जखमी विशाल कांबळे याला तातडीने ससून रुग्णालयात दाखल करून उपचार सुरू केले गेले, पण त्याचा मृत्यू झाला
रेवती हिंगवे
पुण्यात गेल्या काही काळात अनेक घटना घडत आहे. त्यात गुन्ह्यांचे प्रमाण हे अलिकडच्या काळात मोठ्या प्रमाणात वाढताना दिसत आहे. चोरी, हाणामाऱ्या, महिलांवरील अत्याचार हे कुठे ना कुठे होताना दिसतच आहेत. त्यात भर म्हणजे टोळी युद्धाची. टोळी युद्धाने ही पुण्यात डोकं वर काढलं होतं. त्यामुळे सर्वच जण हादरून गेले होते. एकीकडे पुण्याच्या रस्त्यांवर टोळी युद्धात जीव जात होते हे कमी की काय आता पुण्याच्या येरवडा जेलमध्ये ही एका कैद्याचा खून करण्यात आला आहे. त्यामुळे जेल प्रशासन हादरून गेले आहे.
येरवडा जेलमध्ये ही घटना 15 डिसेंबरला सकाळी सात वाजता घडली आहे. जेलच्या बराक क्रमांक एकमध्ये विशाल कांबळे हा आरोपी होता. त्या बराकमधील इतर आरोपींनी त्याच्यावर हल्ला केला. हा हल्ला फरशीच्या सहाय्याने करण्यात आला. त्यातून त्याच्या डोक्यावर आणि कंबरेवर वार करण्यात आले. हा हल्ला इतका भयंकर होता की त्यात तो जबर जखमी झाला. झाल्यानंतर तो तिथेच खाली कोसळला. या हल्लानंतर जेलमध्ये एकच खळबळ उडाली. धावाधाव झाली.
त्यानंतर कारागृहातले पोलीस बराक क्रमांक एक कडे धावले. त्यांनी तिथे सर्व कैद्यांना पांगवले. जखमी झालेल्या विशाल कांबळे याला ताब्यात घेतले. तो जबर जखमी झाला होता. त्यामुळे त्याला तातडीने रुग्णालयात हलवण्यात आले. ससून रुग्णालयात त्याला उपचारासाठी दाखल करण्यात आले. तिथे त्याच्यावर गेल्या चार दिवसापासून उपचार सुरू होते. मात्र आज शुक्रवारी त्याचा रुग्णालयातच उपचारा दरम्यान मृत्यू झाला.
त्याच्यावर त्याच्याच बराकमध्येमध्ये असलेल्या आकाश चंडालिया आणि दीपक रेड्डी या दोन आरोपींनी हल्ला केला होता. त्यांच्यात नक्की वाद कशामुळे झाला हे अजून ही समोर आले नाही. त्याची चौकशी पोलीस करत आहेत. दरम्यान या घटनेनंतर येरवडा कारागृहातील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. जेल प्रशासन या खूनाने हादरून गेले आहे. शिवाय हा हल्ला नक्की कोणत्या कारणामुळे झाले हे शोधण्याचे दिव्य ही आता जेल प्रशासना समोर आहे.
नक्की वाचा - Kalyan News: 2 तरुणी 1 तरूण अन् दारू पार्टी! नशेत रस्त्यावरच जोरदार तमाशा, Video Viral
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world