जाहिरात

NMMC Election 2026: नवी मुंबईत 'भाई'गिरी चालणार?, 'दादां' विरोधात थेट दंड थोपटणार? महायुतीतच कुरघोडी

असं असलं तरी इथं शिवसेना ठाकरे गट, मनसे, काँग्रेस, राष्ट्रवादी शरद पवार पक्ष यांची काही प्रमाणात ताकद आहे.

NMMC Election 2026: नवी मुंबईत 'भाई'गिरी चालणार?, 'दादां' विरोधात थेट दंड थोपटणार? महायुतीतच कुरघोडी
  • एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना गटाने नवी मुंबई महापालिका निवडणुकीत स्वबळावर लढण्याची तयारी केली आहे.
  • शिंदे गटाला भाजपसोबत युतीत सहभागी होण्याची इच्छा नसल्याचे विश्वसनीय सूत्रांनी स्पष्ट केले आहे
  • नवी मुंबईतील भाजपचे नेते गणेश नाईक आणि शिंदे गटामध्ये थेट आणि तिखट राजकीय संघर्ष होण्याची शक्यता वाढली आहे
आमच्या एआय सारांशामुळे मदत मिळाली?
आम्हाला नक्की कळवा.
नवी मुंबई:

राहुल कांबळे 

नवी मुंबई महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून स्वबळावर लढण्याचे ठोस संकेत मिळू लागले आहेत. युतीत निवडणूक लढवण्यास शिंदे गटाचा फारसा उत्साह नसल्याचे विश्वसनीय सूत्रांचे म्हणणे आहे. त्यामुळे येत्या 21 तारखेला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वबळावर निवडणूक लढवण्याची अधिकृत घोषणा करतील, अशी जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. त्यामुळे नवी मुंबईत भाई विरुद्ध दादा अशी लढत रंगण्याची दाट शक्यता आहे. महायुती असलेले भाजप आणि शिवसेना या निमित्ताने एकमेकांच्या विरोधात ठाकलेले दिसतील. 

हा निर्णय प्रत्यक्षात आला, तर नवी मुंबईतील संपूर्ण राजकीय गणितच बदलणार आहे. असे जाणकारांचे मत आहे. नवी मुंबई महापालिका निवडणुकीत आता भाजप विरुद्ध शिवसेना (शिंदे गट) अशी थेट आणि तिखट लढत होण्याची चिन्हे स्पष्ट दिसत आहेत. एका बाजूला भाजपचे दिग्गज नेते गणेश नाईक आणि त्यांचे कार्यकर्ते युतीला उघड विरोध करत आहेत. तर दुसऱ्या बाजूला शिंदे गटाचे स्थानिक नेते आणि कार्यकर्तेही स्वबळावर रणशिंग फुंकण्याच्या तयारीत उतरले आहेत. नवी मुंबईत गणेश नाईक यांची चांगली ताकद आहे. त्यामुळे ते शिवसेना शिंदे गटाला सोबत घेण्यास तेवढेसे इच्छुक नाहीत. 

नक्की वाचा - BMC Election 2026: मुंबई शहरात कुणाचा दबदबा? कोणत्या प्रभागात किती वार्ड? जाणून घ्या सर्व माहिती एका क्लिकवर

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, स्वतः उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ही नवी मुंबईत युती करण्यास इच्छुक नाहीत. उलटपक्षी, शिंदे गटाने स्वतंत्र ताकद दाखवावी, असा त्यांचा स्पष्ट कल असल्याचे सांगितले जाते. यासंदर्भात नवी मुंबईची जबाबदारी असलेले नरेश म्हस्के तसेच अन्य महत्त्वाच्या नेत्यांना अंतर्गत निर्देश देण्यात आले आहेत, अशी माहितीही समोर येत आहे. येणाऱ्या काळात नवी मुंबईत शिवसेना (शिंदे गट) आणि भाजपचे गणेश नाईक यांच्यात जोरदार राजकीय सामना रंगणार, हे आता जवळपास निश्चित मानले जात आहे. विशेष म्हणजे, ही निवडणूक गणेश नाईक यांच्यासाठी ‘अस्तित्वाची लढाई' ठरणार, अशी राजकीय चर्चा जोर धरू लागली आहे.

नवी मुंबई महापालिकेवर गणेश नाईक कुटुंबाची एक हाती सत्ता राहीली आहे. मग ते कोणत्याही पक्षात असले तरी सत्ता मात्र नाईक कुटुंबाच्याच हातात राहीली आहे. आधी शिवसेना, नंतर राष्ट्रवादी आणि आता भाजपमध्ये गणेश नाईक आहेत. ते कोणत्या ही पक्षात असले तरी त्याचा काही एक परिणाम सत्ताकरणावर होत नाही. मात्र यावेळी त्यांच्या या साम्राज्याला तडा देण्यासाठी एकनाथ शिंदे सरसावले आहेत. नवी मुंबईतील शिंदेचे शिलेदार ही नाईक यांना कडवा विरोध करत आहेत. त्यामुळे इथं युती होण्याची शक्यता तशी कमीच आहे. जरी युती झाली तरी हव्या तशा जागा मिळणार नाहीत. शिवाय नाईक यांच्या नेतृत्वात लढावे लागेल. त्या पेक्षा स्वबळावर लढण्याची तयारी शिंदे गटाने केली आहे. 

नक्की वाचा - Thane News: महायुतीत ट्वीस्ट! शिंदेंच्या ठाण्यात भाजपनं आणला नवा फॉर्म्यूला, कोणाचं टेन्शन वाढणार?

असं असलं तरी इथं शिवसेना ठाकरे गट, मनसे, काँग्रेस, राष्ट्रवादी शरद पवार पक्ष यांची काही प्रमाणात ताकद आहे. जर का भाजप आणि शिवसेना शिंदे गटत परस्पर लढणार असतील तर त्यांच्या फुटीचा फायदा घेण्याची तयारी महाविकास आघाडीने चालवली आहे. तशी रणनिती ही आखली जात आहे. शिवाय स्थानिक भाजप आमदार मंदा म्हात्रे आणि गणेश नाईक यांच्यात पटत नाही. त्यामुळे त्यांच्या नाराजीचा ही फायदा विरोधक उचलण्याची दाट शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे पुढील काही दिवसात इथं काय नाट्यमय घडामोडी घडणार याकडे राजकीय वर्तूळाचे लक्ष लागले आहे.  

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com