अविनाश पवार
एक अशी बातमी जी तुम्हाला आश्चर्याचा धक्का देईल. चक्क चार पायांची कोंबडी! हो, हे खरं आहे. शिरूर तालुक्यातील शिक्रापूरमध्ये ही घटना समोर आली आहे. इथं एका कोंबडीला चार पाय आहेत. जनुकीय बदलामुळे (Genetic Mutation) हे घडलं असल्याचं बोललं जात आहे. कोंबडीला चार पाय आले आहेत ही बातमी वाऱ्यासारखी शिक्रापूरमध्ये पसरली. त्यानंतर ही कोंबडी शहरात चर्चेचा विषय ठरली आहे. शिवाय तिला पाहण्यासाठी ही मोठी गर्दी होत आहे. लोकांना या कोंबडीला पाहून आश्चर्य वाटत आहे.
शिक्रापूर येथील सिकंदर शेख यांचा चिकनचा व्यवसाय आहे. त्यांच्या दुकानात नेहमीप्रमाणे बॉयलर कोंबड्या विक्रीसाठी आल्या होत्या. पण आज सकाळी, त्यांच्या दुकानातील ही कोंबडी पाहून सर्वांनाच धक्का बसला. कारण या कोंबडी चक्क चार पाय होते. ही बातमी सगळीकडे पसरली. कुणाचा त्यावर विश्वास बसत नव्हता. मग सत्य काय आहे हे पाहण्यासाठी नागरिकांनी त्यांच्या दुकानासमोर मोठी गर्दी केली होती.
सिंकदर अनेक वर्षापासून चिकनचा व्यवसाय करतात. ते म्हणाले की, मी माझ्या आयुष्यात पहिल्यांदाच अशी चार पायाची कोंबडी पाहिली आहे. या कोंबडीला पाहून सिकंदर शेख यांनी ही कोंबडी न कापण्याचा निर्णय घेतला आहे. कटिंगसाठी आलेली ही कोंबडी आता ते एक आश्चर्य म्हणून सांभाळणार आहेत. निसर्गातील या विस्मयकारक घटनेमुळे, ही चार पायांची कोंबडी सध्या शिक्रापूर परिसरात चर्चेचा विषय बनली आहे.
विशेष म्हणजे, या कोंबडीची पूर्ण वाढ झाली असून तिचे चारही पाय वेगवेगळे आहेत. तसंच, चारही पायांना स्वतंत्र नखं आहेत. निवृत्त सहाय्यक पशुवैद्यकीय आयुक्त राजेंद्र त्र्यंबके यांनी दिलेल्या माहितीनुसार, जनुकीय बदलामुळे म्हणजेच पॉलिमेलिया (Polymelia) नावाच्या जन्मजात स्थितीमुळे हा प्रकार घडतो. मी माझ्या पूर्ण नोकरीमध्ये आणि आयुष्यात पहिल्यांदात अशी चार पाय असलेली कोंबडी पाहिली आहे. असं त्र्यंबके यांनी सांगितलं. जनुकीय बदलामुळे ही घटना घडली असली, तरी सध्या ही चार पायांची कोंबडी परिसरातील लोकांमध्ये कुतूहलाचा आणि चर्चेचा विषय ठरली आहे.
नक्की वाचा - Teeth Cavity: दातातील किडीचा 1 मिनिटात गेम ओव्हर! हे आहेत 4 प्रभावी घरगुती उपाय