- पुण्यातील पोर्शे अपघातानंतरही अपघातांची मालिका सुरू असून विविध दुर्घटना दररोज घडत आहेत
- आळंदी येथे दोन वर्षाच्या चिमुरडीला डॉक्टर प्रथमेश कोकणे यांच्या भरधाव कारने चिरडल्याने जागीच मृत्यू झाला
- अपघातानंतर डॉक्टर पळाला, लोकांनी त्याचा पाठलाग करून चिंबळी फाट्यावर पकडून ताब्यात घेतले होते
सूरज कसबे
अपघाताचे प्रमाण पुण्यात मोठ्या प्रमाणात वाढले आहे. त्यात पोर्शे कार अपघात प्रकरणानंतर तर पुण्यातील अपघाताची चर्चा संपूर्ण देशात झाली. या अपघातात दोन जणांना नाहक जिव गमवावा लागला होता. मात्र त्यानंतर ही पुण्यात अपघातांची मालिका सुरूच आहे. ती काही थांबलेली नाही. लहान मोठे अपघात जणू नित्याचेच झाले आहेत. असा एक अपघात समोर आला आहे. यात एका दोन वर्षाच्या चिमुरडीला भरधाव कारने चिरडले आहे. संतापजनकबाब म्हणजे या प्रकरणातील आरोपीला पोलीसांनी सोडून दिलं आहे. त्यामुळे पोलीसांची भूमीका संशयाची झाली आहे.
पुण्यातील पोर्श कार अपघातानंतरही आळंदी पोलिसांनी कोणताही धडा घेतला नसल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. आळंदी येथे एक भयंकर अपघात झाला आहे. यावेळी कार चालवणारी व्यक्ती ही डॉक्टर होती. 26 वर्षीय डॉक्टर प्रथमेश कोकणे हा आपली कार चालवत होता. त्याच वेळी त्याच्या भरधाव कारने दोन वर्षांच्या चिमुरडीला उडवले. त्यात तिचा जागीच मृत्यू झाला. श्रुतिका मिरासे असं या चिमुरडीचं नाव होतं.
याकारची धडक इतकी जोरात होती की त्यात त्या चिमुरडने आपला जीव जागेवरच गमावला. अपघात झाल्यानंतर घाबरलेला डॉक्टर प्रथमेश याने तिथून पळ काढला. तिथल्या काही लोकांनी अपघात पाहीला होता. शिवाय अपघातानंतर डॉक्टर पळत असल्याचं ही काहींनी पाहीलं. लगेचच काही नागरिकांनी त्याच्या कारचा पाठलाग केला. शेवटी चिंबळी फाटा येथे त्याला पकडले. काहींनी त्याला तिथेच दणके देत जाब विचारला. मात्र त्याच्याकडे कोणत्याच प्रश्नाचे उत्तर नव्हते. लोकांचा संताप अनावर झाला होता.
डॉक्टरला पकडल्यानंतर काहींनी याची माहिती आळंदी पोलीसांना दिली. त्यानंतर पोलीस त्या ठिकाणी काही वेळात दाखल झाले. पोलीस आल्यानंतर आरोपी डॉक्टरचा ताबा पोलीसांना देण्यात आला. हा संपूर्ण अपघात सीसीटीव्ही मध्ये कैद झाला आहे. असं असतानाही आळंदी पोलीसांनी या आरोपीला सोडून दिले आहे. आळंदी पोलिसांनी ठोस पुराव्यांचे कारण दिले आहे. शिवाय अटकेच्या तरतुदीचे अजब कारण पुढे केले आहे. आरोपी डॉक्टरवर केवळ गुन्हा दाखल करून त्याला अटक न करताच सोडून दिले आहे. या संतापजनक भूमिकेमुळे पोलिसांच्या प्रतिमेवर आणि कार्यपद्धतीवर आता चौफेर टीका होत आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world