अविनाश पवार, पुणे
पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील पिंपरखेड आणि परिसरात गेल्या 20 दिवसांपासून सुरू असलेल्या बिबट्याच्या हल्ल्यामध्ये तिघांचा बळी गेला होता. अखेर वनविभागाने नरभक्षक बिबट ठार केलं आहे. यामुळे नागरिकांनी काहीसा सुटकेचा निश्वास सोडला आहे.
20 दिवसांत बिबट्याने घेतला तिघांचा बळी
12 ऑक्टोबर 2025 रोजी सहा वर्षाच्या शिवन्या बोंबे, 22 ऑक्टोबर रोजी 70 वर्षांच्या भागुबाई जाधव आणि 2 नोव्हेंबर रोजी 13 वर्षांच्या रोहन बोंबे या तिघांचा दुर्दैवी मृत्यू बिबट्याच्या हल्ल्यात झाला होता. या बिबट्याच्या हल्ल्यात सलग झालेल्या या दुर्दैवी घटनांमुळे शिरूर परिसरामध्ये प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.
(नक्की वाचा- पुणे मेट्रो टप्पा-2 चा विस्तार निश्चित; हडपसर ते लोणी काळभोर, सासवड रोड मेट्रो मार्गिकेस मंत्रिमंडळाची मंजुरी)
बिबट्याच्या हल्ल्याच्या निषेधार्थ 12 ऑक्टोबर व 22 ऑक्टोबर रोजी पंचतळे येथे बेल्हे–जेजुरी राज्यमार्ग तर 3 नोव्हेंबर रोजी मंचर येथे पुणे–नाशिक महामार्ग नागरिकांनी ठिय्या आंदोलन करून 18 तास रोखून धरला होता. संतप्त जमावाने 2 नोव्हेंबर रोजी वनविभागाचे गस्ती वाहन आणि स्थानिक बेस कॅम्पची इमारत पेटवून देत जाळपोळही केली होती.
परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी वनसंरक्षक पुणे, आशिष ठाकरे यांनी प्रधान मुख्य वनसंरक्षक नागपूर यांच्याकडून परवानगी घेऊन नरभक्षक बिबट्याला जेरबंद किंवा ठार करण्याचे आदेश दिले. या मोहिमेसाठी रेस्क्यू संस्था पुणे येथील पशुवैद्य विभागाचे डॉ. सात्विक पाठक तसेच शार्प शूटर डॉक्टर प्रसाद दाभोळकर आणि जुबिन पोस्टवाला यांची नियुक्ती करण्यात आली.
(नक्की वाचा- Pune News: भावाच्या अंत्यसंस्काराला जेलमधून कुख्यात गुंड समीर काळे पोहचला, स्मशानभूमीत ढसाढसा रडला)
सदर पथकाने कॅमेरा ट्रॅप, ठसे निरीक्षण आणि थर्मल ड्रोनच्या साहाय्याने शोधमोहीम राबवली. अखेर रात्री सुमारे 10.30 वाजता घटनास्थळापासून 400–500 मीटर अंतरावर बिबट दिसून आल्यावर त्याला बेशुद्ध करण्यासाठी डार्ट मारण्यात आला. मात्र तो अपयशी ठरल्यानंतर बिबट चवताळून प्रति हल्ला करत असताना शार्प शूटरने गोळी झाडल्याने बिबट ठार झाला. अंदाजे पाच ते सहा वर्षे वयाचा हा नर बिबट असल्याचे प्राथमिक तपासात स्पष्ट झाले आहे.