Pune Metro News: पुणेकरांसाठी अत्यंत महत्त्वाच्या अशा पुणे मेट्रो टप्पा-2 प्रकल्पातील दोन महत्त्वाच्या उपमार्गिकांना मंत्रिमंडळ पायाभूत सुविधा समितीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली आहे. उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी या प्रकल्पांसाठी सातत्याने पाठपुरावा केला होता.
पुणे मेट्रो टप्पा-2 मधील खडकवासला-स्वारगेट-हडपसर-खराडी मेट्रो मार्गिकेअंतर्गत हडपसर ते लोणी काळभोर, हडपसर बस डेपो ते सासवड रोड या दोन उपमार्गिका प्रस्तावित आहेत. या दोन्ही उपमार्गिकांची एकूण लांबी 16 किलोमीटर आहे. या मार्गांवर एकूण 14 उन्नत स्थानके असणार आहेत.
(नक्की वाचा- Pune News: भावाच्या अंत्यसंस्काराला जेलमधून कुख्यात गुंड समीर काळे पोहचला, स्मशानभूमीत ढसाढसा रडला)
प्रकल्पाचा खर्च
या पूर्णतः उन्नत मेट्रो प्रकल्पांसाठी 5,704 कोटी खर्च अपेक्षित आहे. या प्रकल्पांची अंमलबजावणी महा मेट्रोमार्फत केली जाणार आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विश्वास व्यक्त केला की, या प्रकल्पांमुळे पूर्व पुणे आणि आसपासच्या ग्रामीण भागातील नागरिकांना मेट्रो सेवेचा थेट लाभ मिळेल.
या दोन उपमार्गिकांमुळे हडपसर, फुरसुंगी, लोणी काळभोर आणि सासवड यांसारख्या वेगाने वाढणाऱ्या उपनगरांना मेट्रो जोडणी मिळेल. यामुळे पुणे शहरातील वाहतूक कोंडीतून नागरिकांना मोठा दिलासा मिळेल. लाखो प्रवाशांना जलद आणि सुरक्षित वाहतुकीची सुविधा उपलब्ध होईल. तसेच, प्रवासाचा वेळ वाचून प्रदूषण कमी होण्यासही मदत होईल.या मंजुरीमुळे आता पूर्व पुण्यातील मेट्रो जाळे आणखी मजबूत होणार आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world