- हिंजवडीतील नामांकित फलाहार रेस्टॉरंटमध्ये ग्राहकाने मागवलेल्या पावभाजीमध्ये जिवंत किडा आढळला
- या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर रेस्टॉरंट प्रशासनावर अस्वच्छतेचा गंभीर आरोप केला जात आहे
- आयटी कर्मचाऱ्यांसह नागरिकांनी अन्न व औषध प्रशासनाकडे तातडीने कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे
सूरज कसबे
अनेक वेळा नामांकीत रेस्टॉरंटमध्ये जेवणात नको त्या वस्तू पडलेल्याच्या घटना समोर आल्या आहेत. पुण्याचे आयटी हब असलेल्या हिंजवडी परिसरातील एका नामांकित रेस्टॉरंटमध्ये अन्न सुरक्षेचा गंभीर प्रकार समोर आला आहे. येथील प्रसिद्ध 'फलाहार' रेस्टॉरंटमध्ये एका ग्राहकाने मागवलेल्या खाद्यपदार्थात जिवंत किडा आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. नामांकित हॉटेल्समधील अस्वच्छता आणि निष्काळजीपणा यावर आता तीव्र आक्षेप घेतला जात आहे.
नेमका काय आहे प्रकार?
एका ग्राहकाने हिंजवडीतील फलाहार हॉटेलमध्ये खाण्यासाठी पावभाजीची ऑर्डर दिली होती. या पावभाजीसोबत देण्यात आलेल्या काकडीच्या स्लाइसवर चक्क एक जिवंत किडा रेंगाळताना ग्राहकाला दिसला. ग्राहकाने तत्काळ या प्रकाराचा व्हिडिओ आपल्या मोबाईलमध्ये कैद केला. त्यानंतर तो सोशल मीडियावर पोस्ट केला. हा व्हिडिओ समोर आल्यानंतर हॉटेल प्रशासनाच्या निष्काळजीपणावर चहुबाजूंनी टीका होत आहे. तिथे असलेल्या इतर ग्राहकांनी ही याबाबत संताप व्यक्त केला आहे.
नक्की वाचा - Pune News: ज्याच्यावर विश्वास टाकला, त्यानेच माऊलींचा खजिना लुटला; आळंदी हादरली!
आरोग्याशी खेळ, कारवाईची मागणी
हिंजवडी आयटी पार्कमध्ये काम करणारे लाखो तरुण रोज जेवणासाठी आणि नाश्त्यासाठी बाहेरील हॉटेल्सवर अवलंबून असतात. अशा नामांकित आणि महागड्या हॉटेल्समध्येच जर ग्राहकांच्या आरोग्याशी असा खेळ केला जात असेल, तर सर्वसामान्यांनी विश्वास कोणावर ठेवायचा, असा संतप्त सवाल उपस्थित केला जात आहे. या घटनेमुळे हिंजवडी परिसरातील हॉटेल व्यवस्थापनाच्या स्वच्छतेबाबत गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. अन्न व औषध प्रशासनाने (FDA) या घटनेची तातडीने दखल घेऊन संबंधित रेस्टॉरंटवर कडक कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी आता नागरिकांमधून आणि आयटी कर्मचाऱ्यांमधून केली जात आहे.
या घटना कशा टाळणारा?
अशा घटना पुण्यातच नाही तर इतर ठिकाणी ही घडल्याचे आपण पाहील्या आहेत. यासाठी काही कडक निर्बंध लादणे गरजेचे आहे. अन्न व औषध प्रशासनाने ही वेळोवेळी हॉटेल्सच्या स्वच्छतेबाबत परिक्षण करणे गरजेचे आहे. मात्र अन्न व औषध प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष होत आहे का असा प्रश्न ही निर्माण झाला आहे. शिवाय हॉटेल मालकाने ही रेस्टॉरंटच्या स्वच्छतेकडे लक्ष देणे तेवढेच गरजेचे होवून बसले आहे. जर पैसे देतो तर आम्हाला सेवा ही तशीच मिळायला हवी असं ग्राहकांचे म्हणणे आहे.