जर तुम्हालाही निसर्गाच्या सानिध्यात राहून काहीतरी थ्रिलिंग करायची इच्छा असेल, तर महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने (MTDC) तुमच्यासाठी एक सुवर्णसंधी आणली आहे. सातारा जिल्ह्यातील मुनावळे, जे आपल्या निसर्गसौंदर्यासाठी आणि अथांग जलाशयासाठी ओळखले जाते, तिथे आता एका दिवसाची खास साहसी सहल आयोजित करण्यात आली आहे. विशेष म्हणजे पुण्यातील पर्यटकांना डोळ्यासमोर ठेवून हे पॅकेज तयार करण्यात आले असून फेब्रुवारी महिन्यात विविध तारखांना ही सहल उपलब्ध असेल.
नक्की वाचा: व्हिसाचं टेन्शन सोडा, बॅग भरा! फक्त 1 लाखात फिरून या 'हे' 4 सुंदर देश
फेब्रुवारीच्या तारखा जाहीर झाल्या
निसर्गप्रेमी आणि साहसी पर्यटनाची ओढ असलेल्या लोकांसाठी हे टूर पॅकेज 14, 15, 21, 22 आणि 28 फेब्रुवारी 2026 या दिवशी उपलब्ध करून देण्यात आले आहे. विकेंडच्या सुट्ट्यांचा आनंद लुटण्यासाठी हे एक उत्तम डेस्टिनेशन ठरणार आहे. एमटीडीसीचे वरिष्ठ प्रादेशिक व्यवस्थापक हनुमंत हेडे यांनी सांगितले की, पर्यटकांना एकाच दिवसात निसर्ग, इतिहास आणि थरार असा त्रिवेणी संगम अनुभवता यावा यासाठी या सहलीचे नियोजन करण्यात आले आहे.
केवळ 3,200 रुपयांत सर्व सोयी-सुविधा
या पॅकेजचे सर्वात मोठे आकर्षण म्हणजे त्याचे वाजवी दर. केवळ 3,200 रुपये प्रति व्यक्ती या दरात पर्यटकांना अनेक सुविधा मिळणार आहेत. यामध्ये पुण्याहून मुनावळेला जाण्यासाठी आणि परतण्यासाठी वातानुकूलित (AC) बसचा प्रवास, सकाळचा स्वादिष्ट नाश्ता, दुपारी जेवण (शाकाहारी आणि मांसाहारी दोन्ही पर्याय उपलब्ध) आणि संध्याकाळची हाय-टी यांचा समावेश आहे. प्रवासादरम्यान पर्यटकांना कोणत्याही त्रासाशिवाय फिरता यावे यासाठी अनुभवी सहल व्यवस्थापक आणि प्रथमोपचार संचही सोबत असणार आहे.
नक्की वाचा: जुने कपड्यांमधून पैसे कमावयचेत? ही ट्रीक 99.9% लोकांना माहिती नाहीये
वॉटर स्पोर्टसचा आनंद लुटा
मुनावळे बोट क्लब येथे पर्यटकांना 4 प्रमुख वॉटर राईड्सचा आनंद घेता येईल. यामध्ये जेट स्की, बनाना राईड, व्हर्लपूल राईड आणि बम्पर राईड यांचा समावेश आहे. कोयना जलाशयाच्या निळ्याशार पाण्यात या राईड्सचा थरार अनुभवणे हा एक अविस्मरणीय अनुभव ठरेल. तसेच, वॉटर राईड्सनंतर पर्यटकांना निसर्गरम्य तलाव परिसरात रिलॅक्सेशन आणि फोटो क्लिक करण्यासाठीही पुरेसा वेळ दिला जाणार आहे.
ऐतिहासिक वारशाचेही दर्शन घडवणार
ही सहल केवळ साहसी खेळांपुरती मर्यादित नाही, तर यामध्ये ऐतिहासिक वास्तूंच्या दर्शनाचाही समावेश आहे. पर्यटकांना प्रसिद्ध 'बारा मोटेची विहीर' (ऐतिहासिक बावडी) आणि 'शेंबडी मठ' पाहायला मिळणार आहे. सकाळी 6:00 वाजता पुण्याच्या सेंट्रल बिल्डिंगमधून सुरू झालेला हा प्रवास रात्री 8:00 वाजता पुन्हा पुण्यात संपणार आहे. या सहलीसाठी जागा मर्यादित असल्याने 'आधी येणाऱ्यास प्राधान्य' या तत्त्वावर बुकिंग सुरू करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी किंवा नाव नोंदणीसाठी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ, प्रादेशिक कार्यालय, पुणे किंवा दिपाली गुजर (9689136791), सिद्धेश तुंगलकर (7796590375), आणि गोविंद खवणेकर (8275677619) यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.