अजिंक्य धायगुडे पाटील, प्रतिनिधी
Pune News : पुण्यातील गुन्हेगारी विश्वात पुन्हा एकदा मोठ्या गँगवॉरचा भडका उडण्याची शक्यता निर्माण झाली असून, पोलिसांच्या कडक बंदोबस्तालाच थेट आव्हान देणारा एक अत्यंत भयानक कट उधळण्यात आला आहे. कोर्टातून धुळे आणि नंदुरबारच्या दिशेने कैद्यांना घेऊन जाणाऱ्या थेट पोलीस वाहनाचाच मैलोन्मैल पाठलाग करत एका मोठ्या हत्येची रेकी केली जात असल्याचे समोर आले आहे. पोलिसांच्या सतर्कतेमुळे हा धक्कादायक कट वेळेवर उघडकीस आला असून पुण्यातील गुन्हेगारी वर्तुळात या घटनेमुळे तीव्र खळबळ उडाली आहे.
काय आहे प्रकरण?
सहकारनगर भागात झालेल्या प्राणघातक हल्ल्याप्रकरणी तुरुंगात असलेल्या कृष्णा आंदेकर, स्वराज वाडकर आणि तुषार वाडकर या तिघांना पुणे पोलिसांनी शिवाजीनगर न्यायालयात हजर केले होते. कोर्टातील कामकाज संपल्यानंतर पोलिसांचे पथक या आरोपींना घेऊन पोलीस वाहनाने धुळे आणि नंदुरबारच्या दिशेने रवाना झाले. मात्र, त्यांचे वाहन कोर्टातून बाहेर पडताच दुचाकीवरून आलेल्या काही संशयितांनी थेट पोलीस वाहनाचाच पाठलाग सुरू केला. शिवाजीनगर ते थेट चाकणपर्यंत हे तरुण पोलिसांच्या ताफ्यावर पाळत ठेवून मागावर होते.
( नक्की वाचा : Video Call Murder: पत्नीला गळफास देत असताना पतीने केला व्हिडिओ कॉल; जन्मदात्यांसमोरच संपवला लेकीचा जीव )
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या पाठलागादरम्यान आरोपी केवळ पाळत ठेवून नव्हते, तर बंदोबस्तात किती पोलीस आहेत, गाडीचा वेग किती आहे आणि कोणत्या मार्गाने ताफा जात आहे याची संपूर्ण रेकी करत होते. ही सर्व माहिती मोबाईलवरून थेट सुरज ठोंबरे याला पुरवली जात होती. धक्कादायक बाब म्हणजे, पाठलाग करणाऱ्या तरुणांपैकी एकाकडे जिवंत अग्निशस्त्र म्हणजेच पिस्तूल देखील असल्याची माहिती तपासात पुढे आली आहे.
( नक्की वाचा : Pune News : पुण्यात शेजाऱ्याचाच दोन चिमुकल्या बहिणींवर अत्याचार; 61 वर्षांच्या नराधमाला ठोकल्या बेड्या )
'रिव्हेंज प्लॅन'चा पोलिसांकडून शोध
आंदेकर टोळीने केलेल्या हल्ल्यात मारल्या गेलेल्या आयुष कोमकर, गणेश काळे यांच्या खुनाचा आणि अक्षय म्हस्केवर झालेल्या प्राणघातक हल्ल्याचा बदला घेण्यासाठीच हा 'रिव्हेंज प्लॅन' आखला गेला होता का, या दृष्टीने पोलीस तपास करत आहेत. या प्रकरणी गुन्हे शाखेने वेदांत रोहित सावंत आणि अथर्व दत्तात्रय खोपडेला बेड्या ठोकल्या आहेत. तर, सुरज अशोक ठोंबरे, मानव शरद ढमाले आणि धीरज लखारा यांच्याविरोधात भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. पोलीस उपनिरीक्षक तेजश्री पवार यांनी याप्रकरणी फिर्याद दिली असून आरोपींचा नेमका हेतू काय होता, याचा पोलीस कसून शोध घेत आहेत.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world