Pune News: रिंग रोडसाठी शेतकरी कुटुंबाला रस्त्यावर आणलं; डोळ्यासमोर संसार उद्ध्वस्त

Pune News: पुणे जिल्ह्यातील मुळशी तालुक्यात रिंग रोड प्रकल्पासाठी प्रशासनाने आज पुन्हा एकदा बुलडोझर चालवला. रिहे गावातील शेतकरी विलास शिंदे यांच्या घरावर आणि गोठ्यावर करण्यात आलेल्या या कारवाईमुळे एकच खळबळ उडाली.

जाहिरात
Read Time: 2 mins

अविनाश पवार, पुणे

पुणे जिल्ह्याच्या रिंग रोड प्रकल्पासाठी भूसंपादनाची प्रक्रिया सुरू असताना मुळशी तालुक्यातील रिहे गावात तणावपूर्ण आणि भावनिक वातावरण पाहायला मिळाले. येथील स्थानिक शेतकरी विलास रामचंद्र शिंदे यांच्या उर्वरित घरावर आणि गोठ्यावर प्रशासनाने पोलीस बंदोबस्तात कारवाई केली. मात्र, ही कारवाई करताना प्रशासनाने कोणत्याही प्रकारची माणुसकी दाखवली नसल्याचा आरोप शिंदे कुटुंबाने केला आहे.

गाई गोठ्यात असतानाच कारवाई

कारवाई सुरू झाली तेव्हा विलास शिंदे आणि त्यांचे कुटुंबीय अक्षरशः हतबल झाले होते. गोठ्यात गाई बांधलेल्या असताना आणि घरात संसारोपयोगी साहित्य असतानाच बुलडोझर चालवण्यात आला. "आम्हाला किमान दोन दिवसांची मुदत द्या," अशी विनंती शिंदे यांनी प्रशासनाला केली होती, मात्र ती धुडकावून लावण्यात आली. उद्विग्न झालेल्या शिंदे यांनी, "आता आमचे सर्व काही संपले आहे, आम्ही आता कुठेही झाडाखाली राहू," असे म्हणत हंबरडा फोडला.

Advertisement

(नक्की वाचा-  Aurangpura Renamed: छत्रपती संभाजीनगरमधील औरंगपुराचं नाव बदललं; महापालिकेत नामांतराचा प्रस्ताव मंजूर)

न्यायप्रविष्ट प्रकरणात घाई का?

विलास शिंदे यांच्या दाव्यानुसार, संबंधित जमिनीचे प्रकरण सध्या न्यायप्रविष्ट आहे. न्यायालयाकडून न्याय मिळण्याची आशा असतानाही प्रशासनाने ही घाई का केली, असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. योग्य मोबदला मिळालेला नसताना आणि पुनर्वसनाचा कोणताही ठोस प्लॅन नसताना घरादारावर नांगर फिरवल्याने प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

रात्रीच्या वेळी 'बुलडोझर' कारवाईवर आक्षेप

सर्वात धक्कादायक बाब म्हणजे, या कारवाईचा काही भाग रात्रीच्या वेळी बुलडोझरद्वारे करण्यात आल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. "रात्रीच्या वेळी अशा प्रकारे कारवाई करणे कायदेशीर आहे का?" असा संतप्त सवाल आता विचारला जात आहे. एका सामान्य शेतकऱ्याचे घर उद्ध्वस्त करण्यासाठी संपूर्ण सरकारी यंत्रणा एकवटल्याचे विदारक चित्र रिहे गावात पाहायला मिळाले.

(नक्की वाचा-  Bhendwal Bhakit: राज्यात पाऊस कसा असेल? राजकीय उलथापालथ होणार? भेंडवळच्या भाकितानं चिंता वाढली)

प्रशासनाकडून भूमिकेची प्रतीक्षा

रिंग रोड हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असला तरी, त्यासाठी स्थानिक शेतकऱ्यांना देशोधडीला लावले जात असल्याच्या भावना मुळशीत उमटत आहेत. या कारवाईनंतर परिसरात तणाव असून, बाधित शेतकऱ्याला योग्य न्याय आणि नुकसान भरपाई मिळणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
 

Topics mentioned in this article