- पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील सह्याद्रीच्या डोंगररांगांमध्ये 2000 वर्षांचा इतिहास असलेला नाणेघाट आहे
- भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाने नाणेघाट येथे डिजिटल ऑडिओ गाईड टूर सुरू केला आहे
- सातवाहन काळातील नाणेघाट हा दख्खन पठाराला कोकण किनारपट्टीशी जोडणारा प्राचीन व्यापारी आणि प्रवासी मार्ग होता
अविनाश पवार
प्रसिद्ध नाणेघाटबाबत एक मोठी बातमी समोर आली आहे. पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यात सह्याद्रीच्या डोंगररांगांमध्ये वसलेला ऐतिहासिक नाणेघाट पुन्हा एकदा जागतिक पातळीवर चर्चेत आला आहे. जागतिक वस्तुसंग्रहालय दिनानिमित्त भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाने (ASI) येथे 'ऑडिओ गाईड टूर' आणि 'नाणेघाट खिंडीच्या परिवर्तनाचे' अनावरण केले. तब्बल 2000 वर्षांचा समृद्ध इतिहास जपणाऱ्या या प्राचीन व्यापारी मार्गाला आता डिजिटल हेरिटेज वॉकच्या माध्यमातून एक नवी आणि आधुनिक ओळख मिळणार आहे.
सातवाहन काळातील समृद्धीचा साक्षीदार
प्राचीन भारतातील व्यापार, संस्कृती आणि प्रशासनाचा मुख्य केंद्रबिंदू असलेला नाणेघाट हा सातवाहन काळातील अत्यंत महत्त्वाचा घाटमार्ग मानला जातो. दख्खनच्या पठाराला कोकण किनारपट्टीशी जोडणाऱ्या या मार्गावरून प्राचीन काळी व्यापारी, प्रवासी आणि राजदूतांची मोठी वर्दळ असायची. या घाटातून प्रवास करणाऱ्या व्यापाऱ्यांकडून कर किंवा 'नाणे' वसूल केले जात असल्यानेच या मार्गाला 'नाणेघाट' हे नाव पडल्याचे इतिहासकार सांगतात.
मराठी भाषेच्या अभिजाततेचा मुख्य पुरावा
नाणेघाटातील सर्वात मोठे आकर्षण म्हणजे येथील सातवाहनकालीन ब्राह्मी लिपीतील भव्य शिलालेख होय. इतिहास अभ्यासकांच्या मते, हा शिलालेख इ.स.पूर्व 1 ल्या शतकातील असून, यात सातवाहन राजघराण्याची माहिती, तत्कालीन धार्मिक विधी, दानसंस्कृती आणि सामाजिक जीवनाचा महत्त्वपूर्ण दस्तऐवज मिळतो. विशेष म्हणजे, प्राकृत भाषेत आणि ब्राह्मी लिपीत कोरलेला हा लेख महाराष्ट्राच्या भाषिक परंपरेचा पाया मानला जातो.
इतिहास पुन्हा जागा झाला
मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळवून देण्याच्या लढ्यातही या प्राचीन शिलालेखाचा संदर्भ अत्यंत महत्त्वाचा पुरावा म्हणून सातत्याने मांडला गेला आहे. आता एएसआयच्या (ASI) या नव्या डिजिटल उपक्रमामुळे हा जागतिक ठेवा देश-विदेशातील पर्यटकांपर्यंत अधिक प्रभावीपणे पोहोचणार आहे. आता सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यांत दडलेला 2000 वर्षांपूर्वीचा इतिहास पर्यटकांना प्रत्यक्ष ऐकता आणि अनुभवता येणार आहे. नाणेघाट हा केवळ एक ट्रेकिंग पॉईंट नसून प्राचीन भारतातील एक मुख्य व्यापारी मार्ग होता. सातवाहन साम्राज्याच्या काळात दख्खनचे पठार आणि कोकण किनारपट्टीला जोडणारा हा सर्वात मोठा मार्ग होता.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world