अविनाश पवार
मुलांना आईवडील लहानाचे मोठे करतात. आपल्या लेकरांना तळ हाताच्या फोडा प्रमाणे जपतात. त्यांना हवं नको ते देतात. त्यांचं शिक्षण, त्यांचे पालन पोषण, त्यांचं लग्न, अगदी त्यांची मुलं याचे ही लाड हेच आई बाप करत असतात. अशा आई वडिलांना वृद्धावस्थेत सांभाळण्याची जबाबदारी तशी त्यांच्या मुलांची असते. तेवढीच माफक आपेक्षा ते आई वडील करतात. पण ते ही काही मुल पूर्ण करतात. त्यांना आपलेच आई वडिल एक बोजं वाटतात. त्यांना ते नकोशे होतात. लहान पणी त्यांनी आपल्यासाठी काय केलं आहे याची विसर त्यांना पडतो. अशा स्थितीत ते माता पिता मात्र एकाकी पडलेले असतात. त्यांच्या जवळ असते ते दुख: आणि त्यांचे आश्रू. पण अशी वागणूक आपल्याच आई वडिलांना देणाऱ्या मुलाला कोर्टाने चांगलाच दणका दिला आहे.
आई–वडिलांची सेवा ही नैतिकच नाही तर कायदेशीर जबाबदारीही आहे. हा संदेश अधोरेखित करणारा महत्त्वाचा निर्णय पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील नारायणगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतून समोर आला आहे. ज्येष्ठ नागरिकांचा सांभाळ न करणाऱ्या मुलाला न्यायालयाने चांगलाच दणका दिला आहे. अशा नालायक मुलाला कोर्टाने तीन महिने सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली आहे. शिवाय पाच हजार रुपयांचा दंड ही ठोठावला आहे. जुन्नर मधील निमगाव सावा विठ्ठल बाबुराव गाडगे हे राहतात. त्यांचे वय हे 80 वर्षे आहे. त्यांना त्यांची दोन मुलं सांभाळत नव्हती. त्यामुळे त्यांनी आपल्या दोन मुलांविरुद्ध नारायणगाव पोलिसांकडे तक्रार केली होती.
तक्रारीनुसार, सप्टेंबर 2022 पासून ते मे 2025 पर्यंत दोन्ही मुलं वडिलांच्या घरात राहत होती. पण त्यावेळी ही दोन्ही मुलं त्यांचा आणि त्यांच्या पत्नीची कोणती ही काळजी घेत नव्हते. अन्न,औषध, देखभाल अशा कोणत्याच जबाबदाऱ्यां त्यांनी पार पाडल्या नाही. त्यांनी आई वडीलांकडे दुर्लक्ष केले असे या तक्रारीत म्हटले होते. आपल्याच घरात त्या दोघांनाही परक्यासारखी वागणूक मिळत होती. त्यामुळे या वयातही 80 वर्षांच्या विठ्ठल यांनी आपल्या मुलांना अद्दल घडवण्याचे ठरवले. जेणे करून अन्य मुलंही त्यांच्या सारखं स्वत: च्या आई वडीलांना वाईट वागणूक देतील.
दरम्यान या प्रकरणी ज्येष्ठ नागरिक व पालकांचे संरक्षण व कल्याण अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. प्रकरणाचा तपास पोलीस हवालदार एस. एम. कोकणे यांनी काटेकोरपणे पूर्ण केला. त्यानंतर दोषारोपपत्र न्यायालयात दाखल केले. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी अनंत बाजड यांनी सर्व पुराव्यांचा बारकाईने अभ्यास करून आरोपी लक्ष्मण विठ्ठल गाडगे यांना दोषी ठरवले. शिवाय त्याला शिक्षा ही जाहीर केली. हा निर्णय मुलांनी आई-वडिलांप्रती कर्तव्य विसरू नये याचा ठळक इशारा देणारा ठरला आहे. समाजातही या निकालाची चर्चा वाढली असून, “पालकांचा सांभाळ हा पर्याय नसून कर्तव्य आहे” हा संदेश पुन्हा अधोरेखित झाल्याची भावना व्यक्त होत आहे.