पुण्यातील जैन बोर्डिंगच्या जमिनीवरील वाद दिवसेंदिवस चिघळत चालला आहे. या प्रकरणात मुंबईतील धर्मदाय आयुक्तांनी “जैसे थे” परिस्थिती कायम ठेवण्याचा आदेश दिला आहे. मात्र या निर्णयानंतर आता राजकीय स्तरावर नवे आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. माजी आमदार रवींद्र धंगेकर यांनी थेट धर्मदाय आयुक्तच या प्रकरणात सामील असल्याचा धक्कादायक आरोप केला आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. शिवाय हे प्रकरण एका वेगळ्याच वळणावर गेले आहे. त्यामुळे सत्य काय असा प्रश्न पुणेकरांना पडला आहे.
माजी आमदार धंगेकर यांनी म्हटले आहे की, सुरुवातीला ही जमीन मेरी कंपनीच्या नावावर होती. मात्र नंतर अचानक गोखले कन्स्ट्रक्शन या कंपनीचा या व्यवहारात प्रवेश झाला. “विशाल गोखले आणि पूनम गोखले यांची नावे या विक्री प्रक्रियेत कशा पद्धतीने आली? कोणत्या वेगाने कागदपत्रे तयार करण्यात आली?” असा सवाल धंगेकर यांनी उपस्थित केला आहे. या नावांचा समावेश इतक्या वेगाने कोणाच्या आशिर्वादाने झाला असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे.
नक्की वाचा - Muslim women: मुस्लिम महिला करतायत श्रीरामाची आरती, त्या मागचे कारण ऐकून धक्का बसेल
त्यांनी पुढे म्हटले की, खासदार मुरलीधर मोहोळ यांना देखील या संपूर्ण प्रक्रियेत ट्रस्टी चकोर गांधी यांनी एका धार्मिक कार्यक्रमाच्या निमित्ताने भगवान महावीर मंदिराच्या परिसरातच व्यवहाराचा घाट घालण्यात आला, अशी माहिती दिली. “हे सर्व काही ठरवून आणि त्वरेने केले गेले. त्यामुळे धर्मदाय आयुक्तांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होणे स्वाभाविक आहे,” असे धंगेकर म्हणाले. दुसरीकडे, खासदार मुरलीधर मोहोळ यांनी या प्रकरणातील सर्व आरोप फेटाळून लावले आहेत.
नक्की वाचा - मुघलांच्या काळात कशी साजरी व्हायची दिवाळी? 'जश्न-ए-चिरागां'च्या नावाखाली काय व्हायचं?
त्यांनी स्पष्ट केले की, “मी गोखले कन्स्ट्रक्शन कंपनीतून बाहेर पडलो आहे आणि या जमीन व्यवहाराशी माझा कोणताही संबंध नाही.” मात्र विरोधकांचा दावा आहे की, मंदिर विकल्याचा ठपका हा केवळ एका व्यवहारावर नाही, तर संपूर्ण ट्रस्टच्या निर्णय प्रक्रियेवर प्रश्न उपस्थित करणारा आहे. दरम्यान, धर्मदाय आयुक्तांच्या आदेशामुळे तात्पुरती स्थगिती मिळाली असली, तरी या प्रकरणावरून पुण्यातील राजकारण चांगलेच तापले आहे. पुढील काही दिवसांत या वादाला आणखी नवे वळण मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.